जळालेले सिंगल फेज रोहित्र चार-चार महिने मिळेना
महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे मीटर धारक बेजार

लोकगर्जनान्यूज
केज तालुक्यातील आडस येथे मागील काही महिन्यांपासून महावितरण कंपनीचा कारभार ढेपाळला असून, वरीष्ठ कार्यालयात कोणतेही साहित्य देत नसल्याने येथील वीज सेवा कोलमडून पडली. येथील काही रोहित्र चार महिन्यापूर्वी जळालेले असून, ते संबंधित एजन्सीने काढून ही नेले. परंतु चार महिने होऊन गेले ते अद्याप मिळाले नाहीत. यामुळे येथील वीज ग्राहकांना ( मीटर धारक ) वीजबिल नियमित भरुनही सेवा मिळत नसल्याने संताप व्यक्त करत आडस येथे गुरुवारी ( दि. ६ ) हलगी वाजवून निवेदन दिले.
आडस ( ता. केज ) येथे महावितरण कंपनीने केवळ वसुलीकडे लक्ष दिल्याने वीज वितरणाचा बोजवारा उडाला आहे. येथील हनुमान मंदिर डीपी, डुमने डीपी, रेस्ट हाऊस डीपी या गावातील तीन आणि पेट्रोल पंप डीपी अशा चार डीपी वरील सिंगल फेज चे सहा ( सहा ) रोहित्र जळाले आहेत. याला चार महिने होऊन गेले असून जळालेले रोहित्र संबंधित एजन्सीने काढून नेले. परंतु दुरुस्त करून ते अद्याप ही मिळाले नाहीत. त्यामुळे बायपास करुन सेवा देण्यात येत आहे. यामुळे विजेचा दाब व्यवस्थित मिळत नसल्याने पंखा चालनेही मुश्किल झाले. हनुमान मंदिर डीपीवरील ग्राहकांना शेती पंपाच्या रोहित्रावरुन वीज जोडणी केली आहे. त्या रोहित्रा मध्ये अचानक जास्त दाबाने वीजपुरवठा होऊन अनेकांचे टिव्ही,कुलर,पंखे,चार्जर, मोबाईल, बल्ब आदि जळून मोठे नुकसान झाले. वीज पुरवठा तर कधीच योग्य दाबाने मिळत नाही. हे नेहमीचेच झाले आहे. रोहित्र असून की, फ्यूज तार येथे वरीष्ठ कार्यालयाकडून कोणतेही साहित्य वेळेवर मिळत नसल्याने नियमित वीजबिल भरणा करुनही येथील नागरिक अंधारात चाचपडत आहेत. मात्र गेंड्याची कातडी असलेल्या अधिकाऱ्यांना याचे काहीच सोयरसुतक दिसत नाही. त्यामुळे गुरुवारी ( दि. ६ ) हनुमान मंदिर डीपीवरील ग्राहकांनी हलगी वाजवत जाऊन आडस येथील महावितरण कनिष्ठ अभियंता कार्यालय वर जाऊन शनिवार ( दि. ८ ) तारखेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली. जर शनिवार पर्यंत वीजपुरवठा सुरळीत नाही झाला तर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आता महावितरण कंपनी काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
चार-चार महिने रोहित्र मिळत नसताना सिंगल फेज योजना ठेवलीच का?
गावातील अंधार दुर करण्यासाठी आणलेली सिंगल फेज योजनाच अंधाराचे कारण ठरत आहे. जळालेले रोहित्र चार-चार महिने मिळत नाही. यामुळे वीज ग्राहकांना अंधाराचा सामना करावा लागतो आहे.रोहित्र मिळत नसल्याने ही योजना चालू ठेवण्याचे कारण काय? केवळ लोकांना त्रास देण्यासाठी महावितरण कंपनी सिंगल फेज योजना सांभाळत आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.