रमेश नेहरकर खून प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हाती; परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे जिल्ह्यात केले जेरबंद

केज : मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून जाब विचारण्यासाठी गेलेल्या पित्याला माझ्या सोबत मुलीचे लग्न लावून दे म्हणून धमकी दिली. लग्नाला नकार दिल्याने मुलीच्या पिता असलेल्या रमेश नेहरकर यांच्यावर हल्ला करुन आरोपी फरार झाले. उपचारादरम्यान रमेश नेहरकर यांच्या मृत्यू झाल्याने आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. फरार आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवले होते. पोलीसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा तपास करुन परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तीनही आरोपींना वाघोली ( पुणे ) येथून अटक केली.
रमेश एकनाथ नेहरकर ( वय ४२ वर्ष ) रा. धारूर रोड हा केज ते कळंब रोडने मोटार सायकल वरून येत असताना आरोपींनी संगनमत करून ( दि. ९ एप्रिल ) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास केज-कळंब रोडवर साळेगाव शिवारात शेख फरीद बाबा दर्ग्या जवळ असलेल्या संत सेना महाराज यांच्या मंदिरा जवळ हल्ला करुन डोक्यात लोखंडी रॉड ने मारून गंभीर जखमी केले. नेहरकर यांचेवर लातूर येथे एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना ( दि.११ ) एप्रिल रोजी मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह केज पोलीस ठाण्यात आणून आरोपींना अटक करण्याची मागणी केली . गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी तात्काळ आरोपींना अटक करण्याच्या तपासी अंमलदार यांना सूचना दिल्या. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस नाईक अनिल मंदे यांनी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहाय्यक सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे व त्यांची टीम आरोपींचा शोध कामी विविध ठिकाणी रवाना झाले होते. घटना घडतात आरोपी हे झाशी येथे फरार झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. आरोपींचे मोबाईलचे टॉवर लोकेशनवरून आरोपी हे केज वरून पुणे, झाशी उत्तर प्रदेश या मार्गे परत पुणे येथे येत असल्याची माहिती मिळताच त्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून त्याची खात्री होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मिसळे, त्यांच्या पथकातील अनिल मंदे व दिलीप गित्ते यांनी तात्काळ पुणे येथे जाऊन गुन्ह्यातील तिन्ही आरोपी यांना वाघोली पुणे येथून अटक केली आहे. अत्यंत संवेदनशील असलेल्या या घटनेतील मुख्य आरोपी भागवत संदिपान चाटे रा. तांबवा ता. केज व त्याचे इतर दोन साथीदार अनुक्रमे शिवशंकर हरिभाऊ इंगळे रा इंगळे वस्ती केज आणि रामेश्वर नारायण लंगे रा. जहागीर मोहा ता. धारूर यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु र नं ११४/२०२२ भा दं वि ३०२ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.