केज तालुक्यात शेतकऱ्याने विषारी द्रव्ये प्राशन करुन मृत्यूला कवटाळले
परतीच्या पावसाने नुकसान; पिकाला भाव नाही,रब्बी हंगामही असा तसाच यामुळे होते चिंतेत

लोकगर्जनान्यूज
केज : सततच्या पावसामुळे खरीप पीक गेले थोडेफार हाती पडलं त्याला भाव नाही. रब्बी हंगामही असा तसाच गेला यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्याने शेतातच विषारी द्रव्ये प्राशन करून मृत्यूला कवटाळल्याची घटना कळमअंबा ( ता. केज ) येथे सोमवारी ( दि. १३ ) सकाळी घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पठाण राजेखां उमरावखां रा. कळमअंबा ( ता. केज ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते घरातून शेतात चाललो म्हणून बाहेर पडले. यानंतर सोमवारी ( दि. १३ ) ९ वाजण्याच्या सुमारास त्यांनी कोणतेतरी विषारी द्रव्ये प्राशन केल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच त्यांना तातडीने अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. खरीप हंगामात परतीचा सतत पाऊस झाल्याने पीक वाया गेले. जे थोडेफार हाती पडले त्या पिकाला बाजारात भाव नाही. शासनाकडूनही अद्याप सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळाली नाही. रब्बी हंगामात पीक चांगले येईल अशी आशा होती परंतु हा हंगामही असा तसाच गेला. यामुळे आता वर्षभर कसं भागणार या चिंतेत ते होते. याच कारणातून त्यांनी टोकचे पाऊल उचलले असावं असे नातेवाईकांचे म्हणणं आहे. मंगळवारी पठाण राजेखां यांचा कळमअंबा येथे दुपारी दफनविधी झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,सुना नातवंडे व चार विवाहित मुली असा परिवार आहे.