मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या महापुजेचा बीड जिल्ह्यातील या दांपत्याला मान?

लोकगर्जना न्यूज
बीड : आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडली. यावेळी त्यांच्यासोबत पूजा करण्याचा मान बीड जिल्ह्यातील नवले या वारकरी दांपत्याला मिळालं आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे भक्तीचा मळा फुलतो, विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून वारकरी पायी दिंड्या काढून पंढरपूरात दाखल होतात. आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपल्या घराकडे परत फिरतात. या दिवशी विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होते. नुकतेच राज्यातील नगर परिषदेच्या निवडणूकांची आणि आचारसंहितेची घोषणा झाल्याने मुख्यमंत्री येणार की, नाही. अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु निवडणूक आयोगाने काही अटी सह मुख्यमंत्र्यांना परवानगी दिली. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी रात्री उशिरा कुटुंबासह पंढरपूर येथे दाखल झाले. आज पहाटे त्यांच्या हस्ते महापूजा झाली. यावेळी वारकऱ्यांमधून बीड जिल्ह्यातील रुई ( ता. गेवराई ) येथील मुरली भगवान नवले, जिजाबाई मुरली नवले या वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळाला.
वीस वर्षांपासून करतात विठ्ठलाची पायी वारी
नवले पती-पत्नी मागील वीस वर्षांपासून विठ्ठल -रुखमाईची मनोभावे पायी वारी करतात. त्यांना महापूजेचा मान मिळाल्याने जिल्हा भरातून कौतुक करण्यात येत आहे.