मा.आ. विनायक मेटे यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार; जनसागर लोटला

लोकगर्जना न्यूज
बीड : राज्यातील जनसामांन्यांचा बुलंद आवाज शिवसंग्रामचे सर्वेसर्वा मा.आ.विनायक मेटे यांना साश्रुनयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी राज्यातील कानाकोपऱ्यातून मेटे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी उपस्थिती लावल्याने अंत्यसंस्कारासाठी जनसागर उसळला होता.
आयुष्यभर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे व मराठा आरक्षण विषयी असलेल्या बैठकीसाठी मुंबईला जाताना पुणे-मुंबई महामार्गावर मा.आ. विनायक मेटे यांच्या वाहनाचा अपघात झाला.यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने व तातडीने मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी ( दि. १४ ) पहाटे घडली. ही वार्ता समजताच बीड जिल्हा शोकसागरात बुडाला. रात्री उशिरा त्यांचे पार्थिव बीडमध्ये आले. आज सकाळी अंत्यदर्शनासाठी पार्थिव देह नगर रोडवरील शिवसंग्राम भवन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यानंतर दुपारी १ वाजता फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून विनायक मेटे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघाली. नगर नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कारंचा, बलभीम चौक, साठे चौक अशी अंत्ययात्रा जालना रोडवरील उत्तम नगर येथे गेली येथे मेटे यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना व सामान्य जनतेला अश्रु अनावर झाले. मेटे साहेब परत या… विनायक मेटे अमर रहे या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, बावनकुळे, दरेकर यांच्यासह बीड जिल्ह्यातील व राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते.बीड शहर, केज सह जिल्ह्यात विविध ठिकाणी सर्व व्यवहार बंद ठेवून मा.आ. विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.