माजलगाव तालुक्यात घडली हृदयद्रावक घटना!

चुलत बहीण-भावाचा करंट लागून जागीच मृत्यू
माजलगाव : खेळत खेळत घराच्या छतावर चढताना दोन चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना माजलगाव तालुक्यातील टालेवाडी यांनी येथे घडली आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली असून, अनेक दिवसांपासून येथील रोहित्र ( डीपी ) मध्ये करंट उतरतो आहे. यामुळे वीजपुरवठा असलेल्या ४० ते ५० घरात वीजप्रवाह उतरतो याची संबंधितांनी कल्पना देऊनही दुर्लक्ष केले. यामुळे दोन चिमुकल्यांनी प्राण गमावले आहेत. आतातरी महावितरण कर्मचाऱ्यांना जाग येईल का? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
साक्षी भारत बडे ( वय १२ वर्ष ), सार्थक अशोक बडे ( वय ८ वर्ष ) असे मृत चुलत बहीण-भावाचे नाव आहे. दोन्ही बहीण भाऊ शनिवारी दुपारी भरत बडे यांच्या घरी खेळत होते. खेळत खेळत ते छतावर चढताना त्यांना जोरात करंट लागला व ते जागीच बेशुद्ध पडले. नियमित त्यामध्ये करंट उतरतो हे माहित असल्याने कोणीही हात न लावल्याने मोठा अनर्थ टळला. गावकऱ्यांच्या मदतीने तातडीने दोन्ही बहीण-भावाला उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन दोन्ही मृत झाल्याचे सांगितले. एकाच वेळी दोन्ही बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोघांवरही शनिवारी रात्री ९ च्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला. भरत बडे यांच्या घरा शेजारी असलेल्या विद्युत रोहित्रामध्ये नेहमीच करंट उतरतो आहे. यामुळे येथून वीजपुरवठा असलेल्या घरातही करंट उतरतो. याची कल्पना येथील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा देण्यात आली. त्यांनी याची दखल घेतली नाही त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.