मांजरा धरण ९८.६८ टक्के; केंव्हाही १०० टक्के होऊ शकतो
तीन वर्षांपासून धरण भरतोय पुर्ण क्षमतेने:बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांना दिलासा

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण ९८.६८ टक्के भरले असून कोणत्याही क्षणी १०० टक्के होऊ शकतो. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो त्यामुळे मांजरा काठावर असलेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी दक्ष राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव व मांजरा हे दोन मोठे धरण आहेत. माजलगाव धरण मागेच भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग ही करण्यात आलं. मांजरा धरण भरणार की, नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु मागील आठवडाभरापासून मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. मागील तीन दिवसांपासूनही पाऊस जोरदार सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक सुरू आहे. पहाता पहाता धरण १०० टक्के पर्यंत आले. आज शनिवारी ( दि. १५ ) दुपारी धरण ९८.६८ टक्के भरले असून पाण्याची आवक १२९.२५ घनमिटर प्रति सेकंद सुरु आहे. ही आवक पहाता धरण कधीही पुर्ण क्षमतेने भरु शकतो. आवक अशीच सुरू राहिली तर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करावं लागेल, त्यामुळे मांजरा काठावर असलेल्या गावकरी, शेतकऱ्यांनी दक्ष रहावे. तसेच जनावरे, इतर साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
*पुर्ण क्षमतेने भरण्याचं सलग तिसरे वर्ष
सन २०१७-१८ च्या दुष्काळात मांजरा धरण पुर्णपणे कोरडे ठाक पडलं होतं. पाखराला पाणी पिण्यासाठी येथे नव्हते त्यामुळे बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेच्या तोंडाचे पाणीच पळाले होते. परंतु २०२० पासून निसर्गाने साथ दिली. मागील तीन वर्षांपासून चांगला पाऊस होत असल्याने मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरत आहे. आता धरण १०० टक्के झाले तर हॅट्ट्रिक होणार आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
*लातूर सह अनेक शहर व गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला
मांजरा धरणातून लातूर शहर व एमआयडीसीला पाणी पुरवठा करण्यात येतो तसेच अंबाजोगाई, धारुर,केज यासह काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो तर उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांना येथूनच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे हे धरणाकडे तीन जिल्ह्यातील जनतेचे लक्ष असते. १०० टक्केच्या जवळ गेल्याने या शहरांसह अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.