महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गुटख्याचा ट्रक पकडला: एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाची मोठी कारवाई

लोकगर्जनान्यूज
बीड : महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी आहे. परंतु सर्रास गुटखा विकला जातो. यावर एएसपी पंकज कुमावत यांनी कारवाईला सुरुवात करुन गुटखा माफियांची झोप उडविली आहे. आज शनिवारी ( दि. ४ ) पहाटे पंकज कुमावत यांच्या आदेशावरून त्यांच्या पथकाने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उंदडवडगाव जवळ ट्रक पकडला असून, यामध्ये तब्बल ३६ लाखांचा गुटखा मिळून आलं. गुटखा व ट्रक असा एकूण ५१ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रात गुटखा बंदी असल्याने इतर राज्यातून चोरटी वाहतूक करुन बीड जिल्ह्यात गुटखा आणून विकला जात आहे. त्यामुळे बंदी असली तरी येथे गुटख्याचा नेहमीच सुकाळ आहे. पाहिजे तो गुटखा सहज उपलब्ध होतो. बसवकल्याण ( कर्नाटक ) येथून ट्रक क्र. Gj 12-AY 9425 गुटखा घेऊन धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाने बीड येथे येत असल्याची विश्वसनीय माहिती एएसपी पंकज कुमावत यांना मिळाली. माहिती मिळताच कुमावत यांनी त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. या आदेशावरून पथकाने उदंडवडगाव येथे रस्त्यावर नाकाबंदी केली. दरम्यान संशयित ट्रक आला असता त्यास थांबवून पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये गुटखा आढळून आला. यामध्ये तब्बल ३६ लाखांचा गुटखा व ट्रक असा एकूण ५१ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ट्रक चालक वजीर इम्रान गुलमोहमद, क्लिनर समीर सुलेमान नोतीयारी यांना ताब्यात घेतले. सदरील कारवाई वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विकास चोपने, राजु वंजारे, बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, संजय टुले, सचिन अहंकारे, दिलीप गित्ते, अनिल मंदे यांनी केली. या कारवाईचे सर्वसामान्यामधून कौतुक करण्यात येत असलेतरी हा गुटखा नेमका मागवला होता कोणी? याचाही उलगडा व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.