महागाईची झळ! पालकांच्या खिशाला मुलांच्या पाटी-पुस्तकाचं ओझं झेपेना
वह्या, पुस्तके, दप्तर,पाणी बाटली, टिफीन सर्वच महागले

लोकगर्जनान्यूज
बीड : सध्या सर्वत्र महागाईचा आगडोंब उसळला आहे. या महागाईची झळ आता विद्यार्थी व पालकांना बसत असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा वह्या, पुस्तके, दप्तर, पाणी बाटली, टिफीन,पाटी, पेन्सिल सर्वच महागले आहे. यामुळे आता पालकांच्या खिशाला या महागाईच ओझं झेपेना अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याची चर्चा व्हायची, यावर तोडगा काढण्यासाठी अनेक प्रयोग राबविण्यात आले. परंतु हे ओझं काही कमी झालं नाही. यावर्षी पासून आता या दप्तराचे ओझे पालकांच्या खिशाला परवडत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पुस्तकाच्या भरमसाठ किंमती वाढल्या आहेत. इयत्ता 10 चा पुस्तकाचा पुर्ण सेट मागील वर्षी 600 रुपयांना मिळत असे यावर्षी हा सेट 800 च्या पुढं सरकला आहे.म्हणजे यात तब्बल 200 रुपये पेक्षा जास्त वाढ झाली. या खालोखाल इयत्ता 9 च्या पुस्तकाच्या सेट मध्ये 120 रु. पेक्षा जास्त वाढ झाली. ही वाढ आहे मराठी माध्यमाच्या पुस्तकांची, यात आता सीबीएसई, सेमी इंग्लिश यामध्ये किती वाढ झाली असेल याचा अंदाज येतो. पुस्तका प्रमाणे वह्यांचे ही असेच चित्र आहे. गत वर्षी चांगल्या प्रतीचे वह्या ( notebook ) 330 रु. प्रति डझन विकण्यात आले ते आज 450 रु. प्रति डझन विकावे लागतं आहे. 144 पानांचे रजिस्टर प्रति नग 50 रुपयांनी विकले ते यावर्षी 70 रु.प्रति नग प्रमाणे विकावे लागत आहेत. पेनचा विचार केला तर मागील वर्षी 5 पेनचा पॉकेट 20 रुपयांना होता तो यावर्षी 30 रुपयांचा झाला. 2 रु विक्रीचा पेन 3 रु.तर पेन्सिल प्रती नग 1 रु वाढ झाली. पाटीच्या दरात 30 टक्के वाढ झाली. पाणी बाटली, टिफीन डब्बा, दप्तर पिशवी ( bag ) 25 ते 30 टक्के वाढ झाली. अशी माहिती विक्रेते आकाश कोटे यांनी दिली. तसेच गणवेश,शुज याचीही भरमसाठ वाढ झाली. येत्या काही दिवसांत शाळा सुरू होणार असल्याने पालक मुलांच्या या खरेदीसाठी बाहेर पडत असून, दुकानात खरेदीला गेले की, हे वाढते दर पाहून अनेकांचा पुर्ण खिसा रिकामा होऊनही रक्कम पुर्ण होत नाही. यामुळे गोरगरिबांचे आर्थिक नियोजन ढासळले आहे. पैशा अभावी अनेकजण पुस्तक सोडले तर इतर साहित्य कमी खरेदी करत आहेत. यामुळे विद्यार्थी पालकांवर नाराज दिसत आहेत. या महागाईच्या फटका विद्यार्थ्यांना बसतांना दिसत आहे.
जुने पुस्तक पाऊन किमतीत
अनेक पालक आर्थिक अडचणीत असले तरी मुलांना शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी पुस्तक, वह्या आवश्यक आहेत. काही रक्कम वाचावी म्हणून अनेक पालक जुने पुस्तक खरेदी करत आहेत. परंतु हे जुने पुस्तकही काही दुकानदार अर्ध्या किमतीत अथवा त्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी करून पाऊन किंमतीत विकत आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्याचे पुस्तक चांगली असली तर त्याही पेक्षा जास्त किमतीत विकत आहेत. त्यामुळे जुने पुस्तक महाग पडत आहेत. यामुळे जुने पुस्तक विकताना पालक व विद्यार्थ्यांनी दुकानदारांना न विकता सरळ विद्यार्थ्यांना विकावित असे आवाहन काही जागरुक नागरिकांमधून केलं जातं आहे.