भीषण अपघात; बीड जिल्ह्यात कामगार दिनी मजुरांवर काळाची झडप
३ ठार ; १९ जखमी दोन गंभीर

लोकगर्जनान्यूज
बीड : मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअपचे टायर फुटून घडलेल्या अपघातात तीन जण ठार तर १९ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी कडा ते देवी निमगाव रस्त्यावर घडली आहे. आज कामगार दिनाच्या दिवशीच मजुरांवर काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
ऋतुजा सतीश महाजन (वय १६ वर्ष), अजित विठ्ठल महाजन (वय १४ वर्ष), श्रावणी विक्रम महाजन (वय १४ वर्ष) असे मयतांची नावे आहेत. आज गुरुवारी सकाळी एका पिकअप मध्ये एकूण २२ मजूर प्रवास करीत होते. दरम्यान हा पिकअप आष्टी तालुक्यातील कडा ते देवी निमगाव रस्त्यावर सासू-सून म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळ जवळ पिकअप आला असताना अचानक टायर फुटून अपघात घडला. या अपघातात वरील तिघांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे तर इतरांवर कडा येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. स्थानिक लोकांनी अपघात घडताच मदत करून जखमींना मदत करुन दवाखान्यात तातडीने दाखल केले.