भाजपा जिल्हाध्यक्षांना पंकज कुमावत यांचा दणका

बीड : शहरा पासून जवळच चऱ्हाटा रोडवर सुरू असलेल्या आलिशान पत्त्याच्या क्लबवर ए.एस.पी. पंकज कुमावत यांनी छापा मारला असून येथून ४७ जणांना ताब्यात घेत अनेक चारचाकी वाहने, मोबाईल असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा क्लब भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीच्या जागेत सुरू असल्याचे सांगितले जात असल्याने शिवसेना पाठोपाठ कुमावत यांनी भाजपा जिल्हाध्यक्षांना दणका दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
चऱ्हाटा रोडवर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीच्या जागेत एसकोर्ट नावाने पत्याचा क्लब सुरू असल्याची गुप्त खबर एएसपी पंकज कुमावत यांना मिळाली. या माहितीच्या आधारे कुमावत यांनी रात्री उशिरा येथे छापा मारला. यामध्ये येथे अनेकजण पत्ते खेळताना मिळून आले असून पकडलेले बहुतांश मोठे मासे असल्याचे सांगितले जात आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या वाहनांतही चारचाकी अलिशान गाड्या जास्त असल्याचं समजतंय. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. हा क्लब सावंत आणि घोडके नावांचे व्यक्त चालवत असल्याचे सांगितले जात असून जागा भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या मालकीची आहे. यापुर्वी गुटखा प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखांच नाव आल्याने ते प्रकरण चांगलेच गाजले आहे. आता पत्त्याच्या क्लब प्रकरणात भाजपा जिल्हाध्यक्षांचे नाव आल्याने हा विषय जिल्हाभर चर्चिला जात आहे.