आपला जिल्हा

केज तालुक्यातील ‘या’गावचे नागरिक रस्त्यासाठी आक्रमक: दुरुस्ती न केल्यास आंदोलन करणार!

लोकगर्जनान्यूज

केज : तालुक्यातील होळ ते कळमअंबा आणि पुढे धारूरला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तरी देखील याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

केज तालुक्यातील होळ, कळमअंबा, उंदरी आणि धारूर तालुक्यातील तांदळवाडी व पुढे धारूर शहराला जोडणाऱ्या रस्त्याचे एकूण अंतर २० कि.मी. आहे. यातील १३ किमी रस्ता हा केज सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या तर उर्वरित ७ किमी रस्ता धारूर उपविभागाच्या अंतर्गत येतो. या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती देखील झालेली नाही. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि दुतर्फा मोठी झुडपे दिसून येत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना कसरत करावी लागते. प्रत्यक्षात कधीही दुरुस्ती झालेली दिसून आली नाही. त्यामुळे ‛कागदावरच दुरुस्ती’ होते की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. धारूर व केज तालुक्याला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम नव्याने सुरू करण्यात यावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा होळ व कळमअंबा ग्रामस्थांनी दिला आहे. या रस्त्याबाबत केज येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यांना दि.२९ डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनावर होळ येथील युवा नेते संग्राम शिंदे, रामराव लोमटे, अ‍ॅड. राजेश शिंदे, गिरिधर शिंदे, हरिश्चंद्र शिंदे, शिवाजी शिंदे, भारत शिंदे, विष्णू शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड, अमोल थोरात आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, याविषयी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता गोविंद शेळके यांच्याशी संपर्क साधला होता. परंतु त्यांचा भ्रमणध्वनी संपर्क क्षेत्राबाहेर असल्यामुळे विभागाचे म्हणणे समजू शकले नाही.

आडस मार्गे धारुरला जोडणारा रस्ताही खराब

होळ येथून आडस-धारुरला जाणाऱ्या रस्त्याही खराब असून धारुर येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाकडे रोहित्र दुरुस्ती, विज बिलाच्या संदर्भातील कामांसाठी होळसह पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थांना खडतर प्रवास करून जावे लागते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »