बीड मधील आगळावेगळा सोहळा! तृतीयपंथी सपना आणि बाळू थाटामाटात विवाह बंधनात अडकले

रथातून वरात, जेवणाच्या पंगती, हजारो वऱ्हाडींची उपस्थिती!
बीड : काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या तृतीयपंथी सपना आणि बाळू यांचा आज सकाळी नियोजित वेळी कंकालेश्वर मंदिर येथे विवाह सोहळा थाटात पार पडला. यावेळी नवरदेवाची रथातून वरात काढण्यात आली तर, उपस्थित वऱ्हाडींसाठी जेवणाच्या पंगती ही झाल्या आहेत. यावेळी सपना व बाळूने मरेपर्यंत एकमेकांची साथ सोडणार नसल्याची भावना व्यक्त केली.
बीड येथील तृतीयपंथी सपना आणि ढोलकी वादक बाळू यांची एका कार्यक्रमात भेट झाली. या भेटीतून त्यांची ओळख व नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. सपना आणि बाळू मागील दोन वर्षांपासून एकत्र रहात आहेत. या काळात त्यांनी सोबत घालवलेल्या प्रदिर्घ काळानंतर प्रेमाला विवाहच रुप देण्याचं ठरवलं, ही इच्छा त्यांनी बीड येथील पत्रकारांसमोर व्यक्त केली. यानंतर या आगळ्यावेगळ्या विवाहाची बीड सह राज्यभरात चर्चा रंगली. यास सुरवातीला काहींनी विरोध ही केला. तसे अनेकजण समर्थनात पुढे आले. ठरलेल्या वेळी आज सकाळी ११:३५ वाजता हजारो वऱ्हाडींंच्या उपस्थित हा आगळावेगळा विवाह पार पडला. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कंकालेश्वर मंदिर अशी वर बाळूची रथातून वरात काढण्यात आली. यामध्ये अनेकजण सहभागी झाले. तृतीयपंथी यांनी वरातीत नाचून आनंद साजरा केला. यामध्ये पहिल्या विवाहित तृतीयपंथी हे कुटुंबासह सहभागी झाले. तसेच तृतीयपंथी यांचे धार्मिक गुरु नंदगिरी यांचीही उपस्थिती होती. यावेळी करणी सेनेच्या संध्या राजपूत, त्यांच्या सहकारी व समाज कल्याण अधिकारी सचिन मडावी यांनी कन्यादान केले. यामध्ये इतर लग्नापेक्षा काहीच कमी नव्हती. रितीरिवाज प्रमाणे हळद, मंगलाष्टका, वऱ्हाडींसाठी जेवणाच्या पंगती हे सर्व असल्याने हा विवाह सोहळा थाटात पार पडला. लग्न झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना तृतीयपंथी सपना आणि बाळूने मरेपर्यंत आम्ही एकमेकांची साथ सोडणार नसल्याची भावना व्यक्त करत आज आनंदी आनंद झाल्याची भावना व्यक्त केली.