बीड-परळी महामार्गावर कार – दुचाकी अपघातात एक ठार;संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको

बीड : भरधाव कार व दुचाकीचा भीषण अपघात घडला आहे. यामध्ये दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना काही वेळापूर्वी बीड-परळी महामार्गावर मैंदा येथे घडली आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने कारची तोडफोड करुन रस्ता रोको आंदोलन सुरू केले. यामुळे तासाभरापासून रस्ता बंद असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पोलीस घटनास्थळी पोचत असल्याची माहिती आहे.
रविंद्र बळीराम चव्हाण ( वय २४ वर्ष ) रा. उतार तांडा मैंदा ( ता. बीड ) असे मयताचे नाव आहे. तो बीड कडून मैंदा येथे येत असताना वडवणी येथून येत असलेली स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम.एच. ०३ बी सी ०४५३ या भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने दुचाकीस्वार व दुचाकी दुर फेकले गेले. गंभीर मार लागून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार तरुणाचा हात तुटून कार जवळ पडला तर, शरीर काही अंतरावर पडलं होतं. दुचाकी रस्त्याच्या खाली पडली होती. या अपघातानंतर जमाव संतप्त झाला. एकत्र येत बीड-परळी महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला. धडक दिलेल्या कारची जमावाने तोडफोड केली. रस्ता रोखल्याने वाहतूक बंद असून, या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपळनेर पोलीस घटनास्थळी रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.