
लोकगर्जनान्यूज
माजलगाव : दारुच्या अहारी गेलेल्या बाप-लेकाची नशेत असतानाच कुरबुर झाली. जन्मदात्याने बांबूचा डोक्यात प्रहार केला अन् मुलगा जागीच ठार झाल्याची घटना आज रविवार (दि.४) सकाळी खानापूर येथे घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, दोन दिवसांपूर्वीच माजलगाव आणि परळी तालुक्यात दारुच्या व्यसनातून मुलाने आईचा, पुतण्याने चुलतीचा खून केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा बापाने लेकाचा खून केल्याचे उघडकीस येताच व्यसना पुढे रक्ताचे नाते खुजे होत असल्याची चर्चा सुरू आहे.
काळू गोपाळ कांबळे (वय २३ वर्ष) असे मयत मुलाचे नाव असून गोपाळ विठ्ठल कांबळे असे आरोपी बापाचे नाव आहे. या दोन्ही बाप लेकांना दारुचे व्यसन जडलेले आहे. दोघेही दारुच्या अहारी गेलेले असल्याने बाप-लेकामध्ये नेहमीच कुरबुर होत असे असे सांगितले जात आहे. आजही बाप-लेकांची कुरबुर झाली यातून बापाने बाजूला पडलेला बांबू उचलून मुलाच्या डोक्यात प्रहार केला असता काळू जागीच कोसळला अन् त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवार (दि.४) सकाळी उघडकीस आली. दोनच दिवस झाले अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथे दारुच्या अहारी गेलेल्या मुलाने आईच्या डोक्यात दगड मारुन तर परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथे दारुड्या पुतण्याने चुलतीवर कुऱ्हाडीने वार करुन खून केला. या घटना ताज्या असतानाच आज बापने मुलाचा खून केल्याची घटना घडली. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.