बीड जिल्ह्यात पुन्हा बिबट्याचा मृत्यू; तीन महिन्यात तिसरी घटना

बीड : जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना लोक विसरले नाहीत तोच पुन्हा शिकाऱ्याने लावलेल्या वाघोरीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. सदरील घटना शिरुर तालुक्यातील भानकवाडी येथील आहे. या सततच्या घटनांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर वाढला काय? असा प्रश्न विचारला जातो आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरुर कासार तालुक्यात भानकवाडी येथील दोरखडा शिवारात शेकाऱ्याने वाघुर लावलं होतं. यामध्ये बिबट्या अडकला. ही घटना शनिवार ( दि. ८ ) दुपारी ४ वाजता घडली. वाघोरित बिबट्या अडकल्याची वार्ता गावामध्ये पसरताच बिबट्याला पहाण्यासाठी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर सदरील घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली असता बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पंचनामा करुन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती बोरघरे, डॉ. मोहळकर, डॉ. लकडे, डॉ. आघाव या चौघांनी घटनास्थळी बिबट्याचे ऑन कॅमेरा शवविच्छेलन केले. यानंतर वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथे बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अशोक काकडे ( वनपरिक्षेत्र अधिकारी ), साधू धसे ( वनपाल ), सिद्धार्थ सोनवणे ( वन्यजीव अभ्यासक ) यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुर्वीही गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन, शहराजवळील बायपास रोडवर वाहनांच्या धडकेत मृत्यू अशा दोन बिबट्यांच्या मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत. यानंतर ही तिसरी घटना उघडकीस आली. यामुळे बिबट्यांचा बीड जिल्ह्यात वावर वाढल्याची चर्चा सुरू झाली असून शेतकऱ्यांमध्ये एका प्रकारे भीती निर्माण झाली आहे.