बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार! नदीच्या पात्रात छोटा हत्ती वाहून गेला तर आष्टीत आमदार पाण्यात अडकले!

लोकगर्जना न्यूज
बीड : आज दिवसभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून नदीनाले ओसंडून वाहत आहेत. नदीच्या पुरात मोहा ( ता. परळी ) येथे अशोक लिलेंडचा छोटा हत्ती व तिघेजण वाहून गेले. यातील दोघांना बाहेर काढले परंतु एकजण वाहून गेला असून शोध घेण्यात येत आहे. तर आष्टी तालुक्यात अडकून पडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी ट्रॅक्टर घेऊन गेलेले आमदारही नदीपात्रात अडकले परंतु काही वेळाने आमदार व नागरिक सुरक्षित बाहेर आले.
बीड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे कापूस, सोयाबीन या पिकांचे नुकसान तर झालेच आहे. परंतु अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. तसेच पुल वाहून गेले आहेत. गेवराई तालुक्यात एक दुचाकीस्वार वाहून गेला होता परंतु तो बाहेर निघाला पण दुचाकी वाहून गेली. आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. परळी तालुक्यातील मोहा येथे अशोक लिलेंडचा मालवाहतूक छोटा हत्ती नदीच्या पुरात वाहून गेला. यामध्ये तीन जण असल्याचे सांगितले जात असून त्यातील दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. परंतु एकजण वाहून गेला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. दुसरी घटना आष्टी तालुक्यातील सोलेवाडी येथे घडली. काही जण पाण्यात अडकल्याची माहिती आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांना मिळाला. माहिती मिळताच आमदार आजबे ट्रॅक्टर घेऊन त्यांच्या मदतीला धावून गेले. पण त्यांचे ट्रॅक्टर नदीपात्रात पाण्यात अडकले. परंतु काही वेळाने आमदार आजबे आणि ग्रामस्थ सुखरुप नदीतून बाहेर पडले. आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.