
लोकगर्जनान्युज
बीड : अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथे आज शुक्रवारी (दि.२) सकाळी एका वृद्ध महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसरी घटना गुरुवारी रात्री परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथे कुऱ्हाडीने वार करुन महिलेचा खून करण्यात आला. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील खून प्रकरणी मुलगा तर परळी तालुक्यातील खून प्रकरणी पुतण्या संशयित आरोपी आहेत.
चोत्राबाई भानुदास सोन्नर (वय अंदाजे ७२ वर्षे) रा. येल्डा (ता.अंबाजोगाई) असे मयत आईचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, चोत्राबाई यांचा खून दगडाने ठेचून करण्यात आला असून, ही घटना आज शुक्रवारी (दि.२) सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चोत्राबाई यांचा मुलगा अमृत भानुदास सोन्नर यास ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे येल्डा गावात खळबळ उडाली आहे. दुसरी घटना परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथे घडली असून, परिमाला बाबुराव कावळे (वय ६५ वर्ष ) रा. कावळ्याचीवाडी असे मयत महिलेचे नाव आहे. पुतण्या हा दारुच्या व्यसनाच्या आहारी गेलेला असून तो नेहमीच चुलती परिमला कावळे यांना दारु पिण्यासाठी पैसे मागत असे, त्या पैसे देत असत पण काल त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी नकार दिला असता पुतण्याने कुऱ्हाडीने सपासप वार करुन निर्घृण खून केला. याप्रकरणी आरोपी चंद्रकांत धुराजी कावळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.