बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी व्हॉईस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलन
विविध मागण्यांचे जिल्हाधिकारी, तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला निवेदन

लोकगर्जनान्यूज
बीड : माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिले जाते. मात्र मध्यमकर्मीच्या प्रश्नांची सोडवणूकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. त्या अनुषंगाने व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने जिल्हाभरात गुरुवारी (दि.11) सकाळी जिल्हाधिकारी, ठिकठिकाणच्या तहसिल कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमेार धरणे आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
बीडमध्ये व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारीतेत 5 वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. वृत्तपत्रांना सध्या जाहिरात जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरासाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघू दैनिक) यांना मारक आहे. लघू दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकाइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. बीडमध्ये झालेल्या धरणे आंदोलनात राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्यवाहक तथा बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, मराठवाडा कार्याध्यक्ष जालींदर धांडे, बीड जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर, राज्य सहकार्यवाह व्यंकटेश वैष्णव, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख डॉ. गणेश ढवळे, उदय नागरगोजे, अनिल जाधव, आनंद डोंगरे, सुनील यादव, रमाकांत गायकवाड, गणेश सावंत, धनंजय जोगडे, अमोल मुळे, ज्ञानोबा वायबसे, अशोक होळकर, शेखर कुमार, जावेद कुरेशी, विक्रांत वीर, केशव कदम, अमित सासवडे, सय्यद इरफान, विनोद जिरे, संतोष राजपूत, शेख रेहान, यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते शेख युनूस, राहूल वायकर, मनोज जाधव यांची उपस्थिती होती. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने अमोल महाजन यांनी निवदेन स्विकारले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता झाली.
एका हाकेत राज्यातील अडीच हजार पत्रकार रस्त्यावर – संदीप काळे
राज्यात सर्वच ठिकाणी, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जबरदस्तपणे आंदोलन पार पडले. यात सगळे पदाधिकारी, सदस्य यांनी खूप मेहनत घेतली. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची ताकद, महत्त्वाचे असणारे विषय कोणते आहेत, आणि ते कशा पद्धतीने मार्गे लागले पाहिजे, यासाठी आज एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं. याचा इतिहास झाला आहे. राज्यात अडीच हजार पत्रकार एका हाकेत कधीच रस्त्यावर आले नव्हते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माहिती महासंचालक यांना हे गंभीर विषय कळून चुकले. या विषयावर तातडीने मार्ग काढू असं आज सर्वांनी सांगितले. आपण सगळ्यांनी मिळून हे आंदोलन यशस्वी केलं, याबद्दल संदीप काळे, संस्थापक अध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडिया यांनी पत्रकारांचे आभार मानले.
आंदोलनाला सर्वस्तरातून पाठिंबा
व्हॉईस ऑफ मीडियाच्या धरणे आंदोलनास पत्रकारिता, सामाजिक, राजकीय, कला क्षेत्रासह अनेक लोकप्रतिनिधींनी पत्र देऊन जाहीर पाठींबा दर्शविला आहे. सर्वस्तरातून पाठिंबा मिळत असल्याने या आंदोलनाला आणखी बळ मिळाले आहे.