बीड जिल्ह्यातून सोन्याचा धूर काढण्याची क्षमता असणाऱ्या सीताफळाला राजाश्रयाची गरज
प्रक्रिया उद्योग नसल्याने रानमेव्याची होतंय माती

लोकगर्जनान्यूज / विशेष
बीड जिल्ह्याला निसर्गाने सीताफळ या रानमेव्याची मोठी देणगी दिली. मात्र यावर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्याने या सोन्यासारख्या रानमेव्याची माती होताना दिसत असून, पिकवून विकण्या पुढे व्यापार सरकताना दिसत नाही. जिल्ह्यातील सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांच्या घरातून सोन्याचा धूर काढण्याची क्षमता असलेल्या सीताफळास राजाश्रयाची गरज आहे. पुढाऱ्यांनी साखर कारखाने उभे करतांना दुसऱ्या उद्योग धंद्याकडं लक्ष द्यावं अशी अपेक्षा डोंगर पट्ट्यातील जनतेतून व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, धारुर, वडवणी, आष्टी, पाटोदा या तालुक्यात बालाघाटाच्या पर्वत रांगा आहेत. या डोंगर पट्ट्यात निसर्गाने सीताफळ या रानमेव्याची मोठी उधळण केली. येथील सीताफळाची चव आणि गोडीची बरोबरीच होऊ शकतं नाही म्हणून धारुर ही यातील प्रसिद्ध वाण(ब्रँड) असून याला मोठीं मागणी आहे. परंतु याला राजाश्रय न मिळाल्याने सोन्याचे दिवस दाखविणाऱ्या सीताफळाची माती होतं आहे. वडवणी आणि अंबाजोगाई तालुक्यातील अपवाद वगळता जिल्ह्यात सिताफळ प्रक्रिया उद्योग नाही. त्यामुळे सीताफळ पिकवून विकण्या पुढे पर्याय नाही. त्यात हा नाशवंत होणार फळ असल्याने तो पिकला की, माती मोल दरात विकावा लागतो. जर याची भुकटी ( पावडर ) तयार झाली तर विकण्याची घाई करण्याची गरज नाही. याला देशाबाहेरील बाजार पेठ मिळेल अन् यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळून दुष्काळामुळे दारिद्र्याचे जिवन जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरातून सोन्याचा धूर निघेल. सीताफळ मानवाच्या शरीराला आवश्यक अन्न घटक देणार फळ असल्याने याच्या भुकटी पासून तयार केलेली आईस्क्रीम, बासुंदीला लोकांची पसंती असल्याने मोठ्या शहरात भरपूर मागणी आहे. सीताफळाचे गर (पल्प) काढून याला डब्बा बंद करून विकता येत. या गर पासून सरबत,जाम बनवले जातात. त्यामुळे यालाही मोठी मागणी आहे. सुमधुर असल्याने याचे सर्वच वेडे आहेत. मात्र याचा अभ्यास केला असता यात अनेक औषधी गुणधर्म असल्याचे दिसून आले. त्यामुळे सीताफळाच्या पानांचा वापर कडू औषधांमध्ये केला जातो. याच्या बियांपासून तेल निर्मिती करुन याचा वापर साबन मध्ये करण्यात येतों, तर जुन्या सीताफळाच्या झाडाच्या सालीची भुकटी (पावडर) ला चमड्याचा बाजारात मोठी मागणी आहे. असा हा सर्वगुणसंपन्न रानमेवा असून, हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. मात्र यासाठी याला राजाश्रयाची गरज आहे.
* सीताफळ शेतकऱ्यांना उत्पन्न देणारे खात्रीचे फळ
सीताफळ असे फळ आहे की, हे डोंगरावर, नदीकाठी, हलक्या, खडक, असलेल्या जमिनीत येणारे आहे. याला शेळी,गाय, म्हैस किंवा कोणताही प्राणी खात नाही. त्यामुळे याला कुंपणाची गरज नाही, अत्यंत कमी पाण्यावर येणारे असल्यामुळे याचे उत्पन्न घेण्यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही. जर पैसा असेल तर याच्या साठवणीसाठी शीतगृह बनवलं आणि तज्ज्ञांमार्फत यासाठी लागणाऱ्या तापमानाची माहिती घेऊन त्याप्रमाणे वातावरण निर्माण केले तर पाच ते सहा आठवडे सीताफळ साठवून ठेवता येते. याची भुकटी (पावडर), डब्बा बंद गर(पल्प) हे घरात कुटीर उद्योग करता येईल. यातून शेतकऱ्यांना ‘अच्छे’ दीन येतील.
* दुष्काळी जिल्ह्यात दहा साखर कारखाने!
बीड हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. शेतीसाठी पाणी नाही,तरी आहे त्या पाण्यावर बरेच शेतकरी ऊसाची लागवड करतात. ऊसाचे क्षेत्र कमी प्रमाणात असल्याने सर्वच साखर कारखान्यांना ऊस मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बरेच कारखाने बंद पडले आहेत. मात्र याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा मिळो अथवा न मिळो पण पुढाऱ्यांना राजकीय फायदा मिळतो. यामुळे सर्वांचं लक्ष साखर कारखाने काढण्यावर आहे, परंतु जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या सीताफळ, रेशीम उद्योगात राज्यात एक नंबरवर असलेल्या जिल्ह्यात यांवर प्रक्रिया करणारा एकही मोठा प्रकल्प नाही याचं आश्चर्य वाटतं. याकडे कोणाचे लक्षच गेले नाही की, शेतकरी सक्षम झालं तर आपल्या मागे फिरायला कार्यकर्ते मिळणार नाहीत त्यामुळे दुर्लक्ष केले जात आहे का?असा सवाल तरुणांमधून विचारला जातो आहे.