अंत्यविधी झालेला व्यक्ती चार दिवसांनी घरी परतला!

बीड : अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. काही लोकांनी याची कल्पना नातेवाईकांना दिली. त्यांनीही मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी केला. परंतु चार दिवसांनंतर अंत्यविधी केलेला व्यक्ती चक्क घरी परतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. घटनेची माहिती पोलीसांना दिली असून अंत्यविधी केलेला व्यक्ती कोण? याचा तपास करण्यात येत आहे. सदरील घटना जालना येथील आहे.
जालना चंदनझिरा परिसरातील सुभाष प्रकाश जाधव हा व्यक्त मागील अडिच महिन्यांपासून गायब होता. दरम्यान चार दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशन परिसरात एका अज्ञात व्यक्तीच्या वाहनाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. मृत्यू पावलेली व्यक्ती सुभाष प्रकाश जाधव असल्याचे जाणवलं त्यामुळे काही लोकांनी याची कल्पना सुभाष यांच्या नातेवाईकांना दिली. त्यांनीही पहिलं असता मृत्यू पावलेली व्यक्ती आणि सुभाष याचे वर्णन हुबेहूब होतं. त्यामुळे नातेवाईकांनी पोलीसांना मृतदेह सुभाष जाधव यांचं असल्याचं सांगत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहावर अंत्यविधी केला. अंत्यविधीच्या चौथ्या दिवशी चक्क सुभाष जाधव हा घरी परतल्याने कुटुंब, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांना धक्का बसला. सुभाषला कोठे गेलता विचारले असता त्यांनी ऊसतोडीसाठी गेलो असल्याचे सांगितले. आपली व्यक्ती जिवंत असल्याचे पाहून कुटुंबाचे आनंद गगनात मावेनासा झाला. परंतु अंत्यविधी केलेला व्यक्ती कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती नातेवाईकांनी पोलीसांना दिली असून ते तपास करीत आहेत.