बीड जिल्ह्यातील या तालुक्यात बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती; न घाबरता अशी घ्या काळजी

लोकगर्जनान्यूज
शिरुर का. : रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांना तालुक्यातील बारगजवाडी, पिंपळनेर फाट्यावर बिबट्या दिसला असल्याचं दावा केला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु वन विभागाने घाबरुन न जाता याच्या हल्ल्या पासून वाचण्यासाठी काही सूचना केल्या आहेत. त्या काय आहेत हे समजून घेण्यासाठी ही बातमी पुर्ण वाचा.
दोन वर्षांपूर्वी शिरुर का. आणि आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला होता. यामुळे बिबट्या म्हटले की, या भागात भीती निर्माण होते. ज्या गोष्टीची भीती तेच घडलं असून बुधवारी ( दि. १५ ) काहींना बारगजवाडी, पिंपळनेर फाटा ( ता. शिरुर का. ) येथे बिबट्याचे दर्शन झाले. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यांनी नागरीकांना एकटे शेतात न जाने, तसेच रात्रीच्या वेळी शेतात जाताना कोणी सोबती घेऊन जाणे, हातात काठी, बॅटरी अथवा टेंबा घेऊन जाणे, मोबाईल असेल तर त्यावर मोठ्या आवाजात गाणी लावावीत, महिला, लहान मुलांना एकटं सोडू नये अशा सूचना केल्या आहेत. सध्या बिबट्या, लांडगे या वन्यप्राण्यांच्या रहाण्याचे दाट अडचणीचे ठिकाण कमी होत आहेत. जसे ऊसतोड, तूर तोडणी काढणीसुरु आहे. त्यामुळे हे प्राणी बाहेर पडत असल्याने नजरेस पडत आहेत. बिबट्या हा प्राणीही माणसांना घाबरतो परंतु शेतकरी, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.