बीडच्या शिक्षण विभागात खळबळ! आयकर रकमेत लाखोंचा घोटाळा: केंद्रीय मुख्याध्यापकाचा प्रताप
धारुर तालुक्यातील दुसरी घटना उघडकीस आल्याने येथे घोटाळेबाजांचा कोणी मार्गदर्शक आहे का?

लोकगर्जनान्यूज
बीड : धारुर तालुक्यातील आसरडोह केंद्रातील केंद्रीय मुख्याध्यापकाने शिक्षकांचा आयकर भरणा न करुन शासनाला २५ लाखांचा चूना तर शिक्षकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेने बीडच्या शिक्षण विभागात खळबळ माजली आहे. यापुर्वीही आंजनडोह केंद्रात असाच प्रकार घडलेला आहे. त्यामुळे धारुर तालुक्यात या घोटाळेबाजांचा कोणी मार्गदर्शक आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच ही पुर्ण रक्कम मी भरण्यासाठी तयार हा केंद्रीय मुख्याध्यापक तयार असल्याचे आसरडोह केंद्रातील शिक्षकांनी लोकगर्जनान्यूजला माहिती दिली.
धारुर तालुक्यातील आसरडोह केंद्रात जिल्हा परिषदेच्या १६ शाळा असून यावर ५७ शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांच्या पगारी वरील कर शासनाला प्रत्येक महिन्याला कर भरला जातो. महिन्याला नाही भरलातर तीन महिन्यांत एकदा चलन भरणे आवश्यक आहे. हे सर्व कामे केंद्रीय मुख्याध्यापकाच्या माध्यमातून होतात. आसरडोहचे केंद्रीय मुख्याध्यापक अनिल शिंदे यांनी सन २०२१-२२ मध्ये आयकरचा एकूण भरणा २५ लाख ७२ हजार १९२ रु. इतका आहे. परंतु यातील १४ लाख ८९ हजार ९१५ इतकाच भरणा केला. १० लाख ८२ हजार २७७ इतक्या रकमेचा अपहार असून सन चालु २०२२-२३ मध्येही नोव्हेंबर अखेरपर्यंत १६ लाख १४ हजार इतकी आयकर रक्कम होते. यातील अद्यापपर्यंत केवळ १ लाख १३२ रु. चलन भरल्याची पावती आहे. इतर रक्कम कुठं आहे. हा प्रश्न आहे. अशा तऱ्हेने सन २१-२२ चालू वर्षात असा एकूण आयकर भरणा रकमेत जवळपास २५ लाख ६४ हजार २७७ इतक्या रकमेची तफावत आहे. हा भरणा न केल्याने केंद्रीय मुख्याध्यापकाने अपहार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. घोटाळा उघडकीस येताच धारुर गटशिक्षणाधिकारी व बीड जि.प. शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. यावर आता शिक्षण विभाग काय? निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
*पैसे भरण्यास तयार
आयकर रकमेत तफावत असल्याची कुणकुण लागताच काही शिक्षकांनी माहिती काढली. त्यामध्ये हा सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर केंद्रातील सर्व शिक्षकांची शनिवारी ( दि. १२ ) आसरडोह येथे बैठक झाली. यामध्येही सर्वांनी जाब विचारला असता केंद्रीय मुख्याध्यापकाने १० डिसेंबर पर्यंत पुर्ण रक्कम भरतो असा शब्द दिला असल्याची माहिती आहे. पण यापुर्वीच हा घोटाळा बाहेर आला.
*घोटाळेबाजांचा मार्गदर्शक कोण?
धारुर तालुक्यातील अंजनडोह केंद्रात ही यापुर्वी असाच घोटाळा झालेला आहे. त्याबाबत कारवाई सुरू आहे. तर आता आसरडोह केंद्रातील प्रकार उघडकीस आला. जवळपास वर्षभरात दोन प्रकार उघडकीस आले असल्याने धारुर तालुक्यात या घोटाळेबाजांचा कोणी मार्गदर्शक आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.