बीडकरांनो सावधान! कोरोना पुन्हा वाढतोय

बीड : जिल्ह्यात कोरोना चांगल्याप्रकारे आटोक्यात आला आहे. परंतु मागील तीन दिवसांपासून पुन्हा बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सावधान होण्याची गरज असून मास्क वापर, हात धुणे तसेच गर्दीच्या ठिकाणी दक्षता घेणं आवश्यक आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण दोन-तीन तर एका दिवशी शुन्य होते परंतु तीन दिवसांपासून कासवं गतीने रुग्ण वाढत आहेत. आज आरोग्य विभागाला १ हजार ७३७ अहवाल प्राप्त झाले. यातील २६ रुग्ण कोरोना बाधित आहेत तर, १ हजार ७११ रुग्ण निगेटिव्ह आहेत. हा आकडा पहाता मागील महिनाभराचा विचार केला तर सर्वाधिक आहे. अंबाजोगाई ४, आष्टी १, बीड १०, धारुर २, गेवराई १, केज २, माजलगाव १, परळी ३, शिरुर २ असे तालुकानिहाय बाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील नऊ तालुक्यात कोरोना रुग्ण आढळले आहेत. केवळ पाटोदा आणि वडवणी तालुक्यात एकही रुग्ण आजच्या अहवालात बाधित नाही.