बजरंग सोनवणेनां धक्का गावच्या ग्रामपंचायत निडणूकीत मुलीचा पराभव; पत्रकार संतोष सोनवणे यांच्या पत्नी विजयी

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्याचे लक्ष लागलेल्या आनंदगाव सारणी ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांची कन्या डॉ. हर्षदा सोनवणे व पत्रकार संतोष सोनवणे यांच्या पत्नी सौ. प्रविणा सोनवणे या दोघांत सरपंच पदासाठी लढत झाली. यामुळे सौ. प्रविणा संतोष सोनवणे यांनी डॉ. हर्षदा बजरंग सोनवणे यांचा दारुण पराभव केला. यापुर्वीही त्यांचा केज नगरपंचायत निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यानंतर स्वतःच्या गावातही पराभव झाल्याने हा बजरंग सोनवणे यांना मोठा धक्का मानण्यात येत आहे.
सलग तीस वर्षांपासून लोकसभेचे उमेदवार व जि.प.चे मा. शिक्षण, आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांची गावच्या ग्रामपंचायतीत एक हाती सत्ता होती. यावेळी ओपन महिलेसाठी सरपंच पद आरक्षित असल्याने कन्या डॉ. हर्षदा बजरंग सोनवणे यांना सरपंच पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरवले होते. यांच्या प्रतिस्पर्धी पत्रकार संतोष सोनवणे यांच्या पत्नी सौ. प्रविणा संतोष सोनवणे या होत्या. संतोष सोनवणे यांचा गावाशी संपर्क व प्रत्येकाच्या अडिअडचणी सोडविण्यासाठी नियमित प्रयत्न या जोरावर सुरवाती पासूनच त्यांनी मतदारांना आपल्याकडे आकर्षित केले होते. ते शेवटपर्यंत कायम राहिले. भरघोस मतांनी सौ. प्रविणा संतोष सोनवणे या विजयी ठरल्या तर डॉ. हर्षदा बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला.