प्रेरणादायी! बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील कन्या एमपीएससीत मुलींमध्ये राज्यातून प्रथम

लोकगर्जना न्यूज
कोणतेही क्लास न लावताना सेल्फ स्टडी ( स्वअध्ययन ) करुन एमपीएससी मध्ये घवघवीत यश संपादन केले असून, ( एनटीसी ) मधून अश्विनी धापसे ही मुलींमध्ये राज्यातून प्रथम आली आहे. या यशाबद्दल तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
धारुर तालुक्यातील अंजनडोह येथील अश्विनी बालासाहेब धापसे ही सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी असून, वडील बालासाहेब धापसे हे कोरडवाहू शेती व काही काळ पारंपरिक मेंढपाळ करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. जेमतेम आर्थिक परिस्थिती असतानाही मुलांनी शिकावं ही त्यांची खुप इच्छा आहे. त्यासाठी बालासाहेब धापसे हे रात्रीचा दिवस करून मेहनत घेत आहेत. अश्विनी बालासाहेब धापसे हीने १० वी पर्यंतचे शिक्षण गावातीलच शाळेत घेतले. यानंतर कोल्हापूर येथून अभियांत्रिकी शिक्षण पुर्ण केले. यानंतर औरंगाबाद येथे बंधु योगीनंद यांच्या सोबत राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एमपीएससी स्पर्धा परिक्षांची तयारी सुरू केली. कोणतेही क्लास न लावता सेल्फ स्टडी केली. २०१९ महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परिक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये एनटीसी मुलींमधून अश्विनी धापसे महाराष्ट्र राज्यातून मुलींमध्ये प्रथम आली आहे. यामुळे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे तीचे व कुटुंबाचे स्वप्न साकार होणार आहे. धारुर तालुक्यातील अंजनडोह या एका छोट्याशा गावातील मुलीने नेत्रदीपक यश संपादन केल्याने अश्विनीने धारुर तालुक्याची व अंजनडोह या आपल्या गावाची मान उंचावली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तसेच ही तरुण मुलं-मुलींसाठी प्रेरणादायी अशी आश्विनीची कामगिरी आहे.