प्रेरणादायी! जागेची कमतरता असतानाही आडसच्या गृहिणीने जपलाय ५० प्रकारांच्या वृक्षांचा खजिना
झाडं आणि वेलींमुळे उन्हाळ्यात ही मिळाला दिलासा - सुषमा आकुसकर

केज तालुक्यातील आडस येथील एका गृहिणीने जागेची कमतरता असतानाही तेलाचे रिकामे कॅन व रंगाच्या बादल्यांचा उपयोग करत विविध झाडे लावून एकाप्रकारे बगीचा तयार केला. यामध्ये ५० प्रकारांच्या अनेक झाडांचा खजिना जतन केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. सध्या ४२ डिग्री तापमान असतानाही झाडांमुळे उन्हाळ्यात ही उष्णतेपासून दिलासा मिळाला असल्याचे बोलताना सांगितले आहे. या वृक्षमित्र गृहिणीचे झाडं व निसर्गावरील प्रेमाचे कौतुक केले जात आहे.
दरवर्षी वाढत असलेलं तापमान कमी करण्यासाठी झाडं लावणं आणि त्यांचं जतन करण्याशिवाय पर्याय नाही. परंतु वृक्ष तोडीच्या तुलनेत लागवडीचे प्रमाण अल्प आहे. अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम होत असून, अनेक बातम्याही येतात. परंतु यातील किती झाडे जतन केली जातात हा संशोधनाचा विषय आहे. जंगल, झाडं कमी झाल्यामुळे निसर्गाचाही समतोल ढासळला आहे. यामुळे कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. दरवर्षी उन्हाळ्यात तापमान वाढत आहे. यावर्षी महाराष्ट्रातील काही भागात ४६ डिग्री पेक्षाही जास्त तापमान गेले आहे. येत्या ५-१० वर्षात काय परिस्थिती असेल? तेव्हा पशु-पक्षी, माणसांचं काय होईल? याबाबत यज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. यासाठीच शासन, प्रशासन, निसर्ग प्रेमी यांच्याकडून वृक्षलागवड करण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु याकडे कोणाचेच लक्ष नाही. कोणाच्या मालकीचे झाडं असतील तर ते विकून पैसा उभा केला जात आहे. अशाही परिस्थितीत काहीजण खरंच वृक्षांवर प्रेम करत असून, त्यांची लागवड व जतन ही करत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे आडस येथील ग्रामपंचायत सदस्य शिवरुद्र आकुसकर यांच्या अर्धांगिनी सुषमा आकुसकर म्हटले तर वावगे ठरणार नाही. बालपणापासूनच वृक्षांची आवड त्यामुळे भेटेल तो झाड, रोप घरी आणून लावणं हे एकच काम. हीच आवड कायम असून, नळाला पाणी नाही आले तर टँकरचे विकत पाणी घेऊन झाडं जोपसली आहेत. सध्या सुषमा रहातात ते छोटंसं घर आहे. जागेची कमतरता पण आवडी पुढे ही अडचण नाहीशी झाली. त्यांनी पाणी व कोल्ड्रिंक्सच्या रिकाम्या बाटल्या, तेलाचे कॅन, रंगाच्या बादल्या ( बकेट ), प्लास्टिकच्या फुटलेल्या घागरी या टाकाऊ वस्तूंचा वापर करत ५० प्रकारची झाडे लावली आहेत. मनी प्लॅंट, गणेशवेल या वेली लावल्या आहेत. शेतात लावण्यासाठी गडलिंबु, आवळा तसेस साधा लिंबू याचेही रोपे तयार केली. पुदीना, ओवा, कडीपत्ता यांचीही लागवड केली असून यांचाच भाजीसाठी उपयोग करतात. या झाडांमुळे निसर्गाचा खूप आनंद घेता येतो पावसाळ्यात अनेक रंगीबेरंगी फुलपाखरांची घरात रेलचेल असते. मागील काही दिवसांपासून तर एक पक्षी दररोज मुक्कामी असतो, तो सुर्य मावळला की, घरात येतो एका वेलीवर रात्रभर झोपून असतो अन् सकाळ झाली की, उडून जातो. हा अनुभव मनाला समाधान देऊन जाणारं आहे. सणासुदीला अनेकजण कृत्रिम झाडं, रोपं लावून सजावट करतात परंतु आम्ही याच झाडांनी सजावट करतात. त्यामुळे येणाऱ्यांना हेवा वाटतो तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांचं म्हत्वही त्यांना समजते. तसेच नातेवाईक अथवा मित्र, मैत्रीण यांचा वाढदिवस असेलतर स्वतः तयार केलेले रोप भेट देऊन त्यांना शुभेच्छा देणं ही सवय अंगीकारले आहे. घरी लावलेल्या झाडांमध्ये सर्व बिया अथवा काडी पासून रोप तयार केलीत, यातील एकही बाजारातून विकत आणलेलं नसल्याचे सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर्षीच्या उष्णतेने एसी,कुलर लावूनही जिवाची घालमेल होत आहे. परंतु आमच्या घरावर पत्रे असूनही या झाडांमुळे झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत डोळ्यासमोर हिरवं-हिरंव दिसत असल्यामुळे मनाला समाधान वाटते. तसेच हिरवळ पाहून उन्हाळ्याची रखरख जाणवतं नाही, उष्णताही जाणवत नसल्याचे सुषमा यांनी सांगितले आहे.
————————————————
प्रतिक्रिया
वाढत जाणारी उष्णता पाहता आपण सर्वानी निसर्गाला जपल पाहीजे, झाड म्हणजे आयुष्याच नव चैतन्य आहे. झाडांना नुसत पाहील तर किती प्रसन्न वाटत.आपल्या घराची अंगणाची शोभा झाडामुळे वाढते आध्यात्म व विज्ञान दोन्ही ही निसर्गाला झाडांना माणतात.सजिवांची अन्न साखळीच झाडांन मुळेच चालू आहे. टाकाऊ प्लाटीकचा वापर ही तूम्ही झाडे लावण्यासाठी करू शकता. व प्रदूषण रोखण्याला हातभार लावू शकता .कमी जागेत कमी पाणी लागणारी झाड ही तूम्ही लावू शकता.जिवांन जगवन हे देखील एक सत्कर्म किंवा पुण्य म्हणा हव तर. घरात आईने जर झाड लावली व ती जगवली तर त्यातून तूमची मुल ही या गोष्टी शिकतील व आवडीने झाड लावतील .मी तर नेहमी माझ्या संपर्कातील व्यक्तींना झाड लावण्या साठी प्रेरीत करते. माझ्याकडे मी तयार केलेली रोप ही त्यांना देते.
सुषमा आकुसकर
आडस ता. केज