पोहण्यासाठी गेलेल्यांची तलावातील चित्र पाहून घाबरगुंडी उडाली; धारुर येथील घटना

लोकगर्जनान्यूज
धारूर : येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या पाठीमागे असलेल्या तलावात पोहण्यासाठी अनेकजण जातात. आजही ते नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी गेले असता तलावात तरंगत असलेला मृतदेह पाहून घाबरगुंडी उडाली. घटनेची माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी पोचले आहेत.
धारुर येथे ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याच्या पाठीमागे डोंगर दऱ्या आहेत. या निसर्गाने निर्माण केलेल्या डोंगर दऱ्यांचा फायदा घेऊन येथे एक तलाव बनविण्यात आले. या तलावात १२ महिने पाणी असतो, यामुळे शहरातील अनेकजण सकाळी फिरणं ही होतं आणि तलावात मुबलक प्रमाणात पाणी असल्याने पोहणंही होतं. शहरापासून अंतरही जवळ आहे. यामुळे या तलावात अनेकजण पोहण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे आज सोमवारी ( दि. २२ ) सकाळी शहरातील काहीजण पोहण्यासाठी गेले होते. त्यांना तलावात एका कोपऱ्यात पाण्यावर काहीतरी तरंगत असल्याचे दिसून आले. जवळ जाऊन पाहिले असता एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याचे लक्षात आले. ते पाहून धक्काच बसला. घटनेची तातडीने पोलीसांना माहिती दिली. माहिती मिळताच धारुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेने धारुर शहरात एकच खळबळ माजली आहे.