मकरसंक्राती निम्मित आगळावेगळा उपक्रम! शिक्षकाच्या घरी महिलांसाठी पुस्तक प्रदर्शन

अंबाजोगाई : मकरसंक्राती हा सुवासिनींचा सण या निमित्ताने अनेकजण आपापल्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. हे निमित्त साधून जि.प. शिक्षक विलास काळे यांच्या पत्नी सौ. सीमा काळे यांनी पुस्तक प्रदर्शन हा आगळावेगळा उपक्रम राबविला. यास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
आडस येथील रहिवासी व मोहखेड ( ता. धारुर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक विलास काळे हे आपल्या कुटुंबासह अंबाजोगाई येथे वास्तव्यास आहेत. विलास काळे हे एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून तर परिचित आहेच परंतु निसर्ग प्रेमी म्हणूनही त्यांची वेगळी ओळख आहे. तसेच विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा कोणी हात पकडू शकत नाही. असे उपक्रमशील शिक्षक आहेत. त्यांच्या पत्नीही पती प्रमाणेच उपक्रमशील आहेत. गृहिणी असूनही त्या नेहमीच सामाजिक उपक्रमात पती विलास यांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी असतात. यावेळी विलास काळे,सीमा काळे या दोघा पती-पत्नीने मिळून मकरसंक्राती निम्मित अंबाजोगाई येथील माळीनगर येथे घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला. तसेच महिलांमध्ये आर्थिक, आरोग्य व संस्कृती साक्षरता तसेच वाचनाची आवड वाढावी म्हणून घरातील पुस्तकांचा खजिना बाहेर काढून पुस्तक प्रदर्शन हा आगळावेगळा उपक्रम राबविला. हळदी कुंकवासाठी घरी आलेल्या महिलांनी पुस्तक प्रदर्शन पाहून समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले. हे पुस्तक प्रदर्शन रविवार ( दि. २२ ) , सोमवार ( दि. २३ ) असे दोन दिवस ठेवलं होतं. या दोन्ही दिवशी शेकडो महिलांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली असल्याची माहिती काळे दाम्पत्यांनी लोकगर्जनान्यूजशी बोलताना दिली.