Beed-तलाठी भरती परीक्षा रद्द करुन पुन्हा एमपीएससी ( MPSC ) मार्फत परीक्षा घ्यावी मागणीसाठी तरुणाई रस्त्यावर

लोकगर्जनान्यूज
बीड : राज्यात नुकतीच तलाठी भरती परीक्षा घेण्यात आली. पण या परीक्षेदरम्यान काही ठिकाणी पेपर फुटीचा तसेच अनेकांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाले असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झालंय म्हणून ही परीक्षा रद्द करुन पुन्हा या परीक्षा लोकसेवा आयोग ( MPSC ) मार्फत घेण्यात यावी या मागणीसाठी बीडमध्ये तरुणाई रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत विविध मागण्यांचे निवेदन दिले.
राज्यातील अनेक पदे रिक्त असून यामुळे प्रशासकीय कामे वेळेवर होत नसल्याने सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच जागा भरती निघत नसल्याने अनेक सुशिक्षित तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. जागा भरती निघाली तरी परीक्षांमध्ये गोंधळ घातला जात असून पेपर फुटीचे प्रकार सर्रास घडत असल्याचे विविध घटना समोर आहेत. बऱ्याच वर्षांनंतर मागे शासनाने तलाठी पद भरतीची प्रक्रिया सुरू केली. यासाठी परीक्षाही घेण्यात आली. या दरम्यान अनेक ठिकाणी पेपर फुटीचा प्रकार घडला असून गुन्हे दाखल झाले आहेत. २०० मार्क गुणांची ही परीक्षा होती परंतु निकाल लागल्यानंतर यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे समोर आले असून याबाबत अनेक बातम्या आहेत. यामुळे सुरवातीपासून ही परीक्षा चर्चेत असून विश्वासहर्तेवर प्रश्न निर्माण करत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणाईने रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयार मोर्चा काढून ही परीक्षा रद्द करुन पुन्हा नव्याने परीक्षा घेण्यात यावी, ही परीक्षा लोकसेवा आयोग ( MPSC ) मार्फत घेण्यात यावी, पोलीस भरती करण्यात यावी, विविध रिक्त पदे भरती सुरू करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुण,तरुणी सहभागी होते.