पीकविमा भरण्यासाठी अवघें दोन दिवस शिल्लक अन् सर्व्हर डाऊन

लोकगर्जनान्यूज
पीकविमा भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै असून शासनाकडून तारीख वाढविण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनो दोन दिवसात पिकांचा विमा भरुन घ्या अन्यथा नुकसान होईल. परंतु हे पोर्टल चालत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात दिसून येत आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले तरी हे नुकसान भरुन निघाव म्हणून शासनाने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल बिमा ( पीकविमा ) योजनेचे कवच दिले आहे. या वर्षी महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक निर्णय घेऊन अवघ्या १ रुपयात पीकविमा उपलब्ध करून दिला. यामुळे पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार असा सर्वांचा अंदाज आहे. गतवर्षीचा विचार करता पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांचा टक्का वाढला असल्याचे सांगितले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी अद्याप विमा भरलेला नसून मागील पाच दिवसांपासून पोर्टलचे सर्व्हर डाऊन असल्याचे सांगितले जात आहे. सर्व्हर डाऊन असल्याने विमा भरण्यासाठी ई-ग्राहकसेवा केंद्रांवर गर्दी आहे. आडस येथील चार-पाच ग्राहक सेवा केंद्र चालकांशी चर्चा केली असता प्रत्येकाने ५ ते १० फॉर्म शिल्लक असल्याची माहिती दिली. ३१ जुलै शेवटची तारीख असल्याने दोन दिवसांत आणखी काही फॉर्म वाढु शकतात असा अंदाज व्यक्त केला. सर्व शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ घेता यावा यासाठी तारीख वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. रात्री पोर्टल चालत असल्याने शेतकऱ्यांवर पीकविमा भरण्यासाठी रात्र जागून काढावी लागते आहे. जर दोन दिवसांत सर्व शेतकऱ्यांना पीकविमा भरता नाही आलं तर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकतो. तसेच यावेळी टप्प्या टप्प्याने पेरणी झाली असल्याने अनेक शेतकरी त्यातच व्यस्त होते. तारीख पुन्हा वाढते म्हणून नंतर भरता येईल म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला नाही. यामुळे पीकविमा भरण्यासाठी वेळ वाढवून देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.