पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कामगार अन् शेतकऱ्यांचा घरासमोर आंदोलनाचा इशारा

लोकगर्जनान्यूज
बीड : अंबा सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन अन् ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकित रकमेसाठी कामगार आणि शेतकऱ्यांनी गुरुवारी ( दि. २२ ) जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे आमची मागणी पुर्ण नाही झाली तर येत्या १ तारखेपासून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या घरासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. यापुर्वीही कारखाना कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन केले. तेव्हा पगार देण्याचे लेखी आश्वासन कारखाना प्रशासनाने दिले आहे. अद्याप वेतन मिळाले नसल्याने कामगारांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना हा रमेश आडसकर यांच्या ताब्यात असून ते चेअरमन आहेत. सध्या हा साखर कारखाना व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला आहे. यावर्षी कारखाना बंद ठेवण्यात आलेला असून कामगारांचे ५ महिन्याचे मुळ वेतन आणि ७ महिने ओव्हर टाईमचे वेतन कंपनीकडे थकित आहे. तसेच शेतकऱ्यांचेही सन २०२१-२२ अन् २०२२-२३ गळीत हंगामातील ऊसाची रक्कम थकीत आहे. वेतनासाठी कामगारांनी ( दि. २६ ) डिसेंबर २०२३ पासून बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १५ फेब्रुवारी पर्यंत कामगारांचे वेतन देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. परंतु १५ तारीख निघून गेली तरी वेतन न मिळाल्याने कामगारांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. यावेळी शेतकरी त्यांच्या सोबत असून ऊसाची थकित बिल देण्यात यावी म्हणून तेही कामगार, शेतकरी आंदोलन करणार आहेत. गुरुवारी ( दि. २२ ) कामगार आणि शेतकरी यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्यामध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या घरासमोर ( दि. १ ) मार्च पासून धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी निर्माण होणाऱ्या परिस्थिला जिल्हा प्रशासन आणि व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनी प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर भुजंग इंगोले, कुलदीप करपे, कालिदास आपेट, सिकंदर पठाण, शिवाजी काटे, राजेभाऊ देशमुख, सुभाष घायतिकडक, श्रीमंत लाड, योगेश शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.