भुरट्या चोरांनी शेतकऱ्यांची झोप उडविली! ‘या’वस्तूची चोरी झाल्याने चिंता वाढली

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथील शेतकऱ्याच्या शेतातून स्प्रिंक्लरचे नौझल भुरट्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज शुक्रवारी ( दि. ११ ) सकाळी उघडकीस आली. यामुळे शेतकऱ्यांनी काय-काय सांभाळावं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
अनेक संकटाच्या कचाट्यातून वाचलेले पीक शेतकऱ्यांच्या पदरात आले. पण यावर भुरट्या चोरट्यांचे संकट आहे. सोयाबीनचा खळा केला अन् माल घरी नाही नेला तर मळून ठेवलेल्या सोयाबीनचे कट्टे, शेतातील कापूस चोरी जात असल्याच्या बातम्या आपण वाचत, ऐकतो आहे. यापुढे आता चोरट्यांनी आता कहर केला. आडस ( ता. केज ) येथील शेतकरी शेख लियाकत महेबुब यांचे धारुर रस्त्यालगत शेती आहे. यामध्ये त्यांनी बटाटा लागवड केली. बटाटा पिकाला स्प्रिंक्लरच्या सहायाने भीजवत आहेत. रात्रीची वीज असल्याने लियाकत यांनी स्प्रिंक्लर सट लावून वीजपुरवठा सुरु झाल्यानंतर पंप सुरू करुन आराम करण्यासाठी घरी गेले. सकाळी पुन्हा शेतात आले परंतु स्प्रिंक्लर दिसत नसल्याने निघून पडले की, काय? म्हणून आत जाऊन पाहिले असता. पाईप होते परंतु सर्व नौझल गायब दिसले. अज्ञात चोरट्यांनी ११ नौझल चोरून नेले असून बाजारभाव प्रमाणे याची किंमत १६ हजार होते. अशी माहिती दिली. याप्रकरणी शेख लियाकत यांनी पोलीसात तक्रार केली नाही. नौझल चोरीला जाण्याची ही पहिलीच घटना असल्याने इतर ऐवज चोरुन नेहणाऱ्या चोरट्यांनी आता स्प्रिंक्लर कडे लक्ष वेधले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रात्री अपरात्री वीज येत असल्याने एकदा विद्युत पंप चालू केला की, पीक भिजावे म्हणून शेतकरी ठिबक, स्प्रिंक्लर, वॉटर गण या साधनांचा वापर करत आहेत. यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी रात्रभर डोळे फोडून जागरण करण्याची गरज नाही. पण यावरही चोरट्यांचा डोळा असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.