
लोकगर्जना न्यूज
धारुर : तालुक्यातील थेटेगव्हाण जवळ माल वाहतूक ट्रकची प्रथम एसटीला पाठी मागून धडक बसली. यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने ती समोरुन येणाऱ्या कारला धडकली व नंतर खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या तीन वाहनांच्या विचित्र अपघातामध्ये कारमधील चौघे गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी माजलगाव येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी ( दि. ३ ) दुपारी खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर अरूंद रस्त्यामुळे थेटेगव्हाण ( ता. धारुर ) जवळ माजलगाव येथून धारुर कडे येत असलेली माल वाहतूक ट्रक क्रमांक एम. एच. २१ डी एच ५१०५ याचा धारुर येथून माजलगावच्या दिशेने चाललेल्या पंढरपूर -परतूर एसटी क्रॉसिंग करताना ट्रक व बस अरुंद रस्त्यामुळे मागील बाजूस धक्का लागून एकमेकांना घासल्या. धक्का लागल्याचा आवाज येताच ट्रक चालक घाबरला व त्याचे नियंत्रण सुटून बसच्या मागे चालत असलेल्या स्विफ्ट डिझायर कार व ट्रकची समोरासमोर धडक झाली. यानंतर ट्रक रस्त्याच्या खाली खड्ड्यात जाऊन पलटी झाली. ट्रकच्या धडकेने कारची समोरील बाजु चक्काचूर झाली. आतील ज्ञानेश्वर अशोक दिघणे, रत्नदीप भिमराव टाखणकर, सुमित तात्याराव शेंडगे, विजय लिंबाजी धुमाळ सर्व रा. माजलगाव हे चौघे गंभीर जखमी झाले. अपघात घडताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मदत करत जखमींना तातडीने माजलगाव येथे उपचारासाठी पाठवून दिले. घटनेची माहिती मिळताच धारुर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.