आपला जिल्हा

धारुर घाटात व लोखंडी सा. जवळ मालवाहतूक ट्रकचा अपघात; धारुरच्या घटनेत चालक गंभीर जखमी

 

लोकगर्जना न्यूज

धारुर येथील घाटातील अवघड वळणावर सिमेंट घेऊन जाणारा ट्रक तर लोखंडी सावरगाव ( ता. अंबाजोगाई ) जवळ टरबुज घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाले आहेत. या दोन्ही घटना आज सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडल्या आहेत. धारूरच्या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला तर, लोखंडी सावरगाव जवळील घटनेत सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावरील वाढत्या अपघाताच्या घटना चिंतेचा विषय बनला आहे. या घटना रोखण्यासाठी संबंधितांनी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.

धारुर घाट आणि अपघात हे समिकरण बनलं आहे. राष्ट्रीय महामार्ग बनला पण घाटात रस्ता अरूंद असल्याने नियमित अपघाताच्या घटना घडत आहेत. यामध्ये अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सतत अपघाताच्या घटना घडत आहेत तरीही या रस्त्याचे रुंदीकरणाचे कामा बाबतीत फक्त आश्वासने दिली जात आहेत. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद येथून सिमेंट घेऊन माजलगावकडे जात असलेला ट्रक क्रमांक एम.एच. २५ पी ९५४७ च्या चालकाचा एन घाटात तबा सुटला हा ट्रक एका वळणावर पलटी झाल्याने अपघाताची घटना घडली. यामुळे चालक गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे घाटामध्ये बराचवेळ वाहतूक कोंडी झाली होती. दुसरा अपघात याच वेळी ९ च्या सुमारास अंबाजोगाई-केज मार्गावरील लोखंडी सावरगाव जवळ घडला आहे. अंबाजोगाईच्या दिशेने टरबुज घेऊन केजकडे जात असलेला ट्रक अर्धवट काम झालेल्या रस्त्यावर खड्डे चुकवताना विद्युत खांबाचा धक्का लागून पलटी झाला. ट्रक पलटी होताच आतील टरबुज रस्त्यावर पसरले तसेच फुटल्याने रस्त्यावर लाल चिखल झाले असून मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. परंतु सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. लोखंडी सावरगाव जवळील चौकात अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम अर्धवट झाले आहे. त्यामुळे याचा वाहन चालकांना त्रास होत असून अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »