बीड जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून गुरुवारी ( दि. ११ ) दोन तरुण शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना समोर आली. हे दोघेही तरुण शेतकरी असून एकाने साखर कारखाना ऊसाचे बिल देत नाही म्हणून तर दुसऱ्याने अवकाळी पावसाने मिरचीचे पीक उद्ध्वस्त झाल्याने विषारी द्रव्ये प्राशन केले. या दोघांचाही उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
तात्यासाहेब हरीभाऊ पौळ ( वय ४० वर्ष ) रा. लुखामसला ( ता. गेवराई ) असे एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी कर्ज काढून मुलीचे लग्न केले. हे कर्ज ऊसाच्या बिल आले की, फेडण्याचा विचार होता. तात्यासाहेब यांनी पियूष शुगर लि. वाळकी ( अहमदनगर ) या कारखान्याला ऊस दिला. परंतु तीन महिने झाले तरी ऊसाचे बिल न दिल्याने व तीन महिने चकरा मारुनही हक्काचे पैसे मिळत नसल्याने एक व्हिडिओ बनवून तात्यासाहेब पौळ यांनी विषारी द्रव्ये प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच त्यांना उपचारासाठी बीड येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेच उपचारादरम्यान गुरुवारी ( दि. ११ ) प्राणज्योत मालवली. दुसरी घटना धारुर तालुक्यात घडली असून, शिवाजी भलभिम अंडिल ( वय ३५ वर्ष ) रा. ढगेवाडी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी एक एकरावर मिरची लागवड केली. परंतु मागील अवकाळी पावसाने तो पीक पुर्णपणे हातचं गेल्याने कर्ज कसे फिटणार या विवंचनेत विषारी द्रव्ये प्राशन केलं. यानंतर उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले परंतु गुरुवारी ( दि. ११ ) उपचारादरम्यान शिवाजी अंडिल यांची प्राणज्योत मालवली. एकाच दिवशी बीड जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेतकरी आत्महत्या विषयावर स्टोरी बनेल का?
सध्या देशात काल्पनिक केरल स्टोरीची जोरदार चर्चा सुरू आहे. ही स्टोरी काल्पनिक असल्याचे चित्रपटाच्या सुरुवातीला सांगण्यात येते. परंतु महाराष्ट्र मराठवाडा व मराठवाड्यात बीड जिल्हा येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतात. जवळपास मागील एक दशकापासून बीड जिल्हा शेतकरी आत्महत्येत राज्यात सर्वात पुढे आहे. यावर्षी चार महिन्यांत ८१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. हा अधिकृत आकडा असून याची प्रशासनाकडे नोंद आहे. शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हटलं जातं या जगाच्या पोशिंद्याच्या समस्या व आत्महत्या यावर कोणी स्टोरी बनवेल का? यामुळे देशाचं व शेतकऱ्यांच भलं होईल.