थरकाप उडवणारी घटना! शर्यतीत बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसली

बैलगाडी शर्यतीत एक गाडी चक्क प्रेक्षकांमध्ये घुसल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ एका प्रेक्षकाच्या मोबाईलमध्ये कैद झाला असून तो व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली. यात तीन जण गंभीर जखमी झाले असून सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. बैलगाडी शर्यत भाजपा नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. बैलगाडी शर्यत प्रेमी व स्पर्धकांमध्ये उत्साह आहे. परवानगी मिळाली असल्याने अनेक ठिकाणी बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले जात आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे बैलगाडी शर्यत सुरु असताना भीषण दुर्घटना घडल्याचं एका व्हायरल व्हिडिओतून समोर आलं. शर्यतीदरम्यान एक बैलगाडी चक्क प्रेक्षकांमध्ये घुसल्यामुळे मोठा अपघात झाला. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बुधवारी ( दि. २ ) सायंकाळच्या सुमारास ही भीषण घटना घडली. शर्यत पहाण्यासाठी आलेला एक प्रेक्षक शर्यतीचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये करत होता. या दरम्यान ही घटना घडली असून ती पुर्ण मोबाईलमध्ये कैद झाली. तो व्हिडिओ व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.