महिला महाविद्यालयाच्या लोकप्रशासन व हिंदी विभागाची जगदंबा बँकेस अभ्यासभेट

गेवराई : जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील महिला महाविद्यालयाच्या हिंदी व लोकप्रशासन विभागाच्या वतीने विद्यार्थीनींसाठी अध्ययन उपक्रमांतर्गत शहरातील ‘जगदंबा महिला नागरी सहकारी’ बँकेला अभ्यासभेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेण्यात आली.
महाविद्यालयीन विद्यार्थीनींना बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी माहित व्हाव्यात, बँकिंग क्षेत्रातील कामकाज कळावे, रोजगार व व्यावहारिक ज्ञान प्राप्त होऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांचन परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संगीता आहेर, लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा. डॉ. कल्पना घारगे व प्रा. रामहरी काकडे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
या भेटीमध्ये शाखा व्यवस्थापक पल्लवी निकम यांनी विद्यार्थीनींशी मनमोकळा संवाद साधत महिलांना उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधी, विविध आव्हाने व बदलत्या काळानुसार स्वतः आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता विषद केली. यावेळी बँकेच्या अध्यक्षा छायाताई शिवनाथ मस्के, प्रा. बाबू वादे, कॅशियर रेणुका गोरे, पासिंग ऑफिसर प्रियंका रानमारे यांनी कार्यालयीन कामकाजाविषयी माहीती देऊन विद्यार्थीनींच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. बाबू वादे यांनी सहकार्य केले. यावेळी सविता मोरे, रोहिणी चव्हाण, मयुरी चौधरी, कल्याणी खडके, प्रियंका जवंजाळ, कावेरी जवंजाळ, सोनाली ढवारे, अंजली कांडेकर या विद्यार्थीनींची उपस्थिती होती.