डॉक्टरला ९० हजाराचा गंडा…. पोलीस असल्याचं भासवून उकळले पैसे

बीड : येथील एका डॉक्टरला अज्ञात व्यक्तीने फोन करुन तुमच्या विरोधात तक्रार आली असे सांगत पोलीस असल्याचं भासवून ९० हजार रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील मसर्रत नगर येथील डॉ . शेख नसिरुद्दीन शेख बशीरोद्दीन पटेल असे फसवणूक झालेल्या डॉक्टरांचं नाव आहे. त्यांना दि. ७ रोजी एका भामट्याने फोन केला. तुमच्या विरोधात एका पेशंटच्या वडिलांची तक्रार आहे. तुम्हांला नागपूर येथे पोलीस स्टेशनला यावे लागेल. अन्यथा आम्ही तुम्हाला अटक करू अशी धमकी देत पोलीस असल्याचं भासवून पैशाची मागणी केली. घाबरलेल्या डॉक्टर नसीरोद्दीन यांनी गुगल पे द्वारे ९० हजार रुपये पाठवले. यानंतर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यावरून बीड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात फसवणूकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.