झटपट लग्न उरकून घेण्याकडे वधू-वर पित्यांचा कल!

लोकगर्जना न्यूज
लग्न अविस्मरणीय चांगले व्हावे अशी प्रत्येक वधू-वरांची, पालकांची इच्छा असते. परंतु तीन वर्षांपासून कोरोनामुळे यात मोठा बदल घडलेला दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोना बराचसा आटोक्यात आल्याने अनेक निर्बंध उठविले होते त्यामुळे अनेक लग्न धुमधडाक्यात साजरी झाली. मात्र पुन्हा ओमिक्रॉन व्हेरियंट आणि तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत असल्याने निर्बंध कठोर झाले. यापुढे आणखी कडक होऊ शकतात असे संकेत आहेत. त्यामुळे साखरपुड्यातच झटपट लग्न उरकून घेण्याकडे वधू-वर पित्यांचा कल मागील दोन आठवड्यात झालेल्या लग्न समारंभावरून दिसत आहे.
ओमिक्रॉन व्हेरियंटने जगासह भारताचीही झोप उडविली आहे. मागील काही दिवसांपासून वाढत असलेले कोरोना बाधित पहाता तिसरीलाट आलीय का? असा प्रश्न पडतो आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने लग्न समारंभासह विविध कार्यक्रमांवर निर्बंध लागू केले. सध्या लग्नासाठी ५० माणसांना परवानगी असून, पुढे यावर कडक निर्बंध येऊ शकतात. या धास्तीने पुढे होणारी लग्न आताच उरकून घेण्याचा सपाटा सुरू झाला. लग्न जमवून ठेवल्यानंतर वधू पित्याचे लवकर विवाह उरकून घेण्याचा प्रयत्न असतो. मोठं लग्न करण्याच्या विचारात पुढे किती दिवस थांबावे लागले याची शाश्वती नाही. यामुळे आताच विवाह करण्याचा तगादा वधू पिता लावत आहेत. पहिल्या लाटेत अनेकांना लग्न जमलेली असतानाही बोहल्यावर चढण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. या अनुभवामुळे वर पिताही ‘झट मंगणी पट बिहा’ याला पसंती देत आहेत. त्यामुळे मागील १०-१२ दिवसात साखरपुडा, पहाण्यासाठी आले अन् लग्न लावले. असे बरेच झटपट विवाह झाले आहेत. या विवाहामुळे वधू-वर पित्यांचे खर्च वाचत आहेत. अनेक रितीरिवाज मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. परंतु लग्न पत्रिका छापणारे, बँड पथक, कपडे दुकानदार, फुल,मंडप असे विविध व्यवसाय करणाऱ्यांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे या व्यवसायिकांना आता दुसरे काम शोधावं लागतं असून अनेकांनी तर शेतात मजुरी करणं सुरू केलं आहे.