जरांगे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आडस ते अंतरवली दुचाकी रॅली
युवानेते ऋषिकेश आडसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तरुण रवाना

लोकगर्जनान्यूज
आडस : सध्या राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न ऐरणीवर आला. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केली जात आहे. अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आडस ते अंतरवली दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक,आडस येथून युवा नेते ऋषिकेश आडसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रवाना झाली.
मागील अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा तिढा कायम असून, अनेक आंदोलने,मोर्चे झाले परंतु हा प्रश्न कायम आहे. याच प्रश्नी मागील १० ते ११ दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी ( ता. अंबड ) येथे मनोज जरांगे ( पाटील ) यांनी उपोषण सुरू केले. याला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून मागील काही दिवसांपूर्वी येथे आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. यामुळे हे आंदोलन चांगलेच पेटले आहे. बंद, चक्का जाम असे विविध आंदोलने करण्यात येत आहेत. याचे पडसाद गाव पातळीवर पोचले असून ग्रामीण भागात मराठा आंदोलनाला चांगलीच धार आली. याच अनुषंगाने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आडस ते अंतरवली सराटी अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीचे प्रस्थान आज शुक्रवारी ( दि. ८ ) सकाळी १० वाजता युवानेते ऋषिकेश आडसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झाले. यावेळी शिवरुद्र आकुसकर, बालासाहेब ढोले, चेअरमन उद्धवराव इंगोले, बाळासाहेब देशमुख आदी ग्रामस्थ व शेकडो तरुण उपस्थित होते.