चोरट्यांचा बियरवर डल्ला; केज तालुक्यातील घटना

केज : तालुक्यातील विडा येथील बियर शॉपीच्या शटरचे कुलुप तोडून आतील तब्बल ४५ हजार रुपयांचे बियरच्या बॉक्सवर डल्ला मारल्याची घटना ( दि. ९ ) सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. परंतु श्वानाला माग काढता न आल्याने चोरटे वाहनातून गेले असावेत असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
विडा ( ता. केज ) येथील येवता रस्त्यावरील शौर्या बियर शॉपी व हॉटेल रविवारी ( दि. ८ ) रात्री बंद करून घरी गेल्यावर येथे कोणी नसल्याची संधी साधून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शॉपीच्या शटरचे कुलप तोडून आत घुसले. आत ठेवलेले विविध कंपन्यांच्या बियरचे २२ बॉक्स किंमत ४४ हजार ८७२ रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. घटनास्थळी पोलीस नाईक बाळू सोनवणे यांनी भेट देऊन पंचनामा केला. अमोल तुळशीराम ढोबळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.