लोखंडी सावरगाव-पाडळसिंगी राज्य रस्ता 232 च्या कामासाठी पुन्हा आंदोलनाचा इशारा
पाचेगाव, वडगाव चे नागरीक जागे झाले इतरांची झोप कधी संपणार?

लोकगर्जनान्यूज
बीड : जनतेच्या व राष्ट्र हिताचा हा राज्य मार्ग 232 लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे अडगळीत पडला असून, यामुळे सहा तालुके अन् तीन विधानसभा मतदारसंघातील जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी या लोखंडी सावरगाव-पाडळसिंगी रस्त्याचे काम सुरू करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सरपंच, ग्रामस्थांनी सोमवारी ( दि. 29 ) जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला.
लोखंडी सावरगाव-पाडळसिंगी हा राज्य रस्ता 232 आहे. हा रस्ता अंबाजोगाई, केज, धारुर, वडवणी, बीड, गेवराई या सहा तालुके अन् केज, माजलगाव, गेवराई तीन विधानसभा मतदारसंघ तसेच लातूर, बीड,औरंगाबाद, अहमदनगर, जालना या तीन जिल्ह्यांना जोडणारा अन् अंतर कमी करणारा म्हत्वाचा रस्ता आहे. हा रस्ता झाला तर लातूर ते औरंगाबाद व जालनाचे तब्बल 30 कि.मी. अंतर कमी होणार आहे. यामुळे दररोज हजारो लिटर इंधन बचत होऊन राष्ट्रीय संपत्तीची बचत होणार असल्याने हा राष्ट्र हिताचा रस्ता आहे. जिल्हा अंतर्गत विचार केला तर माजलगाव , वडवणी, धारुर आदि तालुक्यातील गंभीर रुग्णांना अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात रेफर करण्यात येतं. या रुग्णांना वेळेत अंबाजोगाई येथे पोचता यावे यासाठी हा एकमेव रस्ता आहे. परंतु सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. एखादा रुग्ण आता या खड्डेमय रस्त्यांमुळे दवाखान्यात पोचण्याधी देवाघरी जाण्याची शक्यता आहे. तसेच लातूर येथे ही अनेक रुग्णांना घेऊन जावं लागतं. अनेकांची मुले-मुली लातूर येथे शिक्षणासाठी आहेत. त्यामुळे या रस्त्याची नितांत गरज आहे. परंतु हा रस्ता व्यवस्थित नसल्याने अनेकजण मोठा वळसा घेऊन लातूर, अंबाजोगाई गाठत आहेत. त्यामुळे पैसा आणि वेळ दोन्ही वाया जात आहे. लोखंडी सावरगाव,आडस, धारुर,चिंचवण, वडवणी, पिंपळनेर, कुक्कडगाव, पाचेगाव, पाडळसिंगी हा रस्ता झाला तर जनतेची मोठी सोय होणार आहे. परंतु हा रस्ता बीडच्या खासदार प्रीतम मु़ंडे, आमदार नमिता मुंदडा, आमदार प्रकाश सोळंके, आमदार लक्ष्मण पवार यांच्या गैर सोयीचा आहे का? असा प्रश्न पडत आहे. नसेल तर मग या रस्त्याचे काम का होऊ शकलं नाही? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
जानेवारीतील निविदेचं काय झालं?
मोठी झाल्यानंतर शासनाने पाडळसिंगी ते वडवणी आणि वडवणी ते लोखंडी सावरगाव असे दोन टप्पे पाडले आहेत. पहिल्या टप्प्यात पाडळसिंगी ते वडवणी पर्यंत रस्त्याला मंजुरी देऊन त्यावर 145 कोटी निधी टाकला आहे. 31 जानेवारी 2023 या रस्त्याची निविदा प्रसिद्ध झाली. परंतु त्यानंतर काहीच हालचाल दिसत नाही. यामुळे या निविदेचं काय झालं? असा प्रश्न उपस्थित करत पाचेगाव, वडगाव येथील सरपंच ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला.
या रस्त्यावरील सर्वच गावांनी आंदोलन करण्याची गरज
लोखंडी सावरगाव-पाडळसिंगी हा राज्य रस्ता 232 लोखंडी सावरगाव फाटा, आडस, धारुर, चिंचवण, वडवणी,ताडसोन्ना, पिंपळनेर, कुक्कडगाव, पाचेगाव, पाडळसिंगी असा जातो. या मार्गावर शेकडो गावं असून, हा रस्ता झाल्यानंतर या गावांना अच्छे दीन येतील. अनेक उद्योग,धंदे वाढतील सर्वात मोठी सोय दळणवळणाची होईल. शेत माल वेळेत व योग्य मार्केटला घेऊन जाता येईल. यासाठी मात्र सर्वांनी एकत्र येऊन रस्त्यासाठी आंदोलन करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. तर पाचेगाव, वडगाव येथील नागरिकांना जाग आली व ते दुसऱ्यांदा या रस्त्यासाठी आंदोलन करत आहेत. पाहुयात इतरांची झोप मोड कधी होणार?