तूर ( tur ) 9400 रु.क्विंटल; जो माल शेतकऱ्यांकडे नसतं त्यालाच भाव वाढतो!
सोयाबीन,कापसाची घसरण सुरुच

लोकगर्जनान्यूज
तूर ( tur ) तुरळक शेतकऱ्यांकडे असेल परंतु त्याचा भाव तेजीत असून, गुरुवारी ( दि. 18 ) लातूर मार्केटला 9400 पर्यंत दर होता. पण सध्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन, कापूस दरवाढीच्या प्रतिक्षेत घरात पडून आहे. याचे दर मात्र घसरत आहेत. त्यामुळे जो माल शेतकऱ्यांकडे नसतं त्यालाच बाजारात भाव वाढतो अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
तूर ( tur ) यावर्षी सुरवाती पासून तेजीत आहे. यामगील कारण उत्पादन कमी झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांकडे तूर ( tur ) होती तोपर्यंत बाजारात 8 हजार रुपये दर होता. परंतु सध्या शेतकऱ्यांकडे तूर नाही तर आता बाजारात 9 हजार 400 रु. प्रतिक्विंटल दर झाला. सध्या शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस दरवाढीची प्रतीक्षा आहे. अनेक शेतकऱ्यांनी दर वाढतील म्हणून आणखी ही सोयाबीन, कापूस घरातच ठेवले आहेत. परंतु याचे दर वाढ काही होत नाही. महिन्याच्या सुरुवातीला तीन-चार दिवस थोडीफार दर वाढ दिसून येते परंतु त्यानंतर पुन्हा घसरण सुरू होते. या मे महिन्यात सोयाबीन 5 हजार 200 पर्यंत तर कापूस 7 हजार 900 पर्यंत पोचला. पण पुन्हा कमी होत होत सोयाबीन 4 हजार 900 ते 5 हजार तर मिलचे दर 5 हजार 100 इतके कमी झाले. कापूस चांगल्या प्रतीचे 7 हजार 400 रु. झाला. फरतड 6 हजार पर्यंत आहे. या दोन्ही पिकांनी शेतकऱ्यांची निराश केली. तूर ( tur ) खालोखाल मूग 6 हजार 300 पासून 7 हजार 500 पर्यंत तर उडीद 6 हजार ते 7 हजार 200 पर्यंत आहे.
यावर्षी तूर व अद्रकीने शेतकऱ्यांना तारले
यावर्षी कापूस, सोयाबीन या दोन्ही प्रमुख पिकांचे दर अपेक्षा प्रमाणे न मिळाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली. परंतु तूर आणि अद्रक ( आले ) या दोन पिकांना समाधान कारक दर मिळाला असल्याने या दोन पिकांनी शेतकऱ्यांना तारल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.