घरकुलासाठी बसला अन् घडलं विपरीत:बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धक्कादायक घटना

लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक व्यक्ती घरकुलच्या मागणीसाठी उपोषणाला बसला होता. त्या व्यक्तीचा उपोषणस्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी ( दि. ४ ) सकाळी उघडकीस आली. या घटनेने खळबळ माजली असून, घटनास्थळी प्रशासनाने धाव घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. घटनास्थळी कुटुंबातील सदस्य आक्रोश करत आहेत.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मयत आप्पाराव भुजाराव पवार रा. वासनवाडी ( ता. बीड ) हे मागील दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर घरकुलच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. परंतु त्यांच्याकडे लक्ष दिले नसल्याने आंदोलन सुरुच होते. आज रविवारी ( दि. ४ ) सकाळी या आंदोलकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. शनिवारी रात्री ते पहाटेच्या दरम्यान थंडीने कुडकुडून मृत्यू झाल्याचं प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. परंतु शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईमुळे या कुटुंबाला घरकुल तर मिळाले नाही. पण त्यांच्यातील एकाचा मृत्यू नशिबी आले. यामुळे जनसामान्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलं आहे.
मृतदेह उचलु देणार नाही: कुटुंब आक्रमक
ज्या घरकुलसाठी आमचं माणूस गेला त्याबाबत ठोस निर्णय होत नाही. आम्हाला आमचे हक्काचे घरकुल मिळत नाही तोपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून उचलु देणार नाही. असा पवित्रा कुटुंबाने घेतला असल्याचे सांगितले जात असून यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे.