सोयाबीनला शनिवारी मिळाला वर्षातील सर्वाधिक भाव
लातूर मार्केटचा ४ हजार ५००, शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपताच भाववाढ सुरू

बीड | लोकगर्जनान्यूज
मागील वर्षांपासून सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. पण शनिवारी (दि.१२) लातूर मार्केटचा प्रतिक्विंटल ४ हजार ५०० रु. भाव निघाला होता. या वर्षातील हा सर्वाधिक भाव मानला जात आहे. तर घसरणारे भाव पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून टाकले असून शनिवारचा भाव पहाता शेतकऱ्यांचा माल संपताच सोयाबीनला तेजी येते की,काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सोयाबीन हा शेतकऱ्यांचा प्रमुख पीक बनला असून, नगदी पीक म्हणून सोयाबीन ओळखले जाते. कापसाच्या तुलनेत मेहनत, खर्च आणि वेळ सर्वच कमी लागत असल्याने शेतकऱ्यांचा कल आता सोयाबीन कडे झुकला आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून सोयाबीन भावाने शेतकऱ्यांची निराशाच केली. शासनाने हमीभाव जाहीर केला पण बाजारात त्यापेक्षा तब्बल हजार रुपये कमीने सोयाबीन विकला जाऊ लागला आहे. तसेच हमीभाव पेक्षा बाजारात कमी भाव असल्याने सोयाबीन प्रक्रिया प्रकल्पांनी सरळ शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदीकडे कानाडोळा केलेला दिसून येत आहे. याचाही परिणाम म्हणून बाजारात सोयाबीनचे भाव दबावातच राहिले. मागील वर्षाचा विचार केला असता शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३ हजार ८०० ते ४ हजार २०० भाव मिळाला आहे. हे भाव पहाता शेतकऱ्यांचा सोयाबीनचा खर्च ही निघणं मुश्किल झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वर्ष झाले तरी सोयाबीनचे दर काही वाढण्याचे नाव घेत नसल्याने तसेच शासनाचे हमीभाव केंद्रावरही सोयाबीन विक्रीसाठी घेऊन गेले तरी १५-१५ दिवस काटा होत नसल्याचे चित्र होते तसेच मागेच शासनाने हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्र बंद केल्याने शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने सोयाबीन विकून मोकळे झाले आहेत. पण शनिवारी (दि.१२) लातूर मार्केटचा पोटली सोयाबीन भाव प्रतिक्विंटल ४ हजार ५०० रु. निघाला आहे. हा भाव पहाता हा या वर्षातील सर्वाधिक भाव मानला जात आहे. हे भाव पहाता शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नसल्याने आता भाववाढ होते की,काय? अशी चर्चा व्यक्त केली जात आहे.
तरी हमीभाव पेक्षा कमीच
शासनाने सोयाबीनला सन २०२४-२५ साठी प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ रु. हमीभाव जाहीर केला. पण या भावाप्रमाणे सोयाबीन वर्षभरात बाजारात विकलेच गेले नाही. वर्षभरात सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ८०० ते ४ हजार २०० असाच भाव मिळाला आहे. तर शनिवारचा ४ हजार ५०० भाव निघाला असला तरी तोही हमीभाव पेक्षा कमीच आहे. तसेच जर हमीभाव जाहीर करुनही त्या भावाने शेतीमाल विकला जात नसेल तर शासन हमीभाव जाहीर करतोच का? असा प्रश्न शेतकरी विचारत असून उगाच शेतकऱ्यांच्या कोपराला गुळ लावू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.