गुड न्यूज! आडस ते पाडळसिंगी रस्त्याचे स्वप्न साकार होणार! आमदार प्रकाश सोळंकेंनी लक्ष घालताच यंत्रणा लागली कामाला

१० मीटरचा असणार रस्ता; प्रशासकीय मान्यता मिळाली
काही दिवसांत निविदा प्रसिद्ध होणार असून अनेक गावांच्या विकासाला चालना मिळणार
लोकगर्जना न्यूज
लोखंडी सावरगाव फाटा ते पाडळसिंगी हा राज्य रस्ता क्र. २३२ अनेक वर्षांपासून रखडलेला होता. परंतु माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी याप्रकरणी लक्ष घातले असून त्यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित करताच यंत्रणा कामाला लागली आहे. ६५ कि.मी. आडस ते पाडळसिंगी रस्त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून अंदाजपत्रक तयार करण्यात आले. लवकरच निविदा प्रसिद्ध होणार असून आमदार सोळंके यांनी वाढीव निधीची मागणी केली. ते निधी नक्कीच पदरात पाडून घेतली व आडस, धारुर, चिंचवण, वडवणी, ताडसोन्ना, पिंपळनेर कुक्कडगाव, पाचेगावसह या रस्त्याला जोडले जाणाऱ्या गावातील नागरिकांचे चांगला रस्ता व्हावं हे स्वप्न साकार होईल असे दिसून येत आहे.
लोखंडी सावरगाव फाटा ते पाडळसिंगी हा राज्य रस्ता क्र. २३२ आहे. या रस्त्यामुळे लातूर, जालना, औरंगाबाद चे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ तसेच पैसा वाचविणारा रस्ता म्हणून याकडे पाहिले जाते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून याचा विकास झाला नाही. त्यामुळे राज्यमार्ग असूनही पुर्ण उखडून गेल्यामुळे मोठी दुरावस्था झाली असून चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. मध्यंतरी हा राष्ट्रीय महामार्ग होणार असेही सांगितले जात होते परंतु सर्वे झाल्यानंतर पुढे काहीच हालचाल नसल्याने हा रस्ता लालफितीत अडकला होता. परंतु दिवसेनदिवस रस्त्याची अवस्था बिकट होत असल्याने वाहन सोडा पायी चालणे मुश्कील झाले आहे. तसेच या मार्गावर अनेक आडबाजूची गावे जोडली जाणार असून. या गावांसाठी हा फक्त रस्ता नाही तर विकासाचा महामार्ग ठरणारा आहे. अनेकांच्या हाताला काम मिळेल तसेच दळणवळण वाढले तर शेतीमाल विक्रीसाठी नेमण्याची सोय होणार आहे. त्यामुळे हा रस्ता करावा अशी मागणी जोर धरत होती. परंतु याकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही असे चित्र होते. परंतु विकासाची दृष्टी असलेले माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी या रस्ता प्रश्नी लक्ष घातले आहे. पाच वर्षांपूर्वी लोखंडी सावरगाव फाटा ते पाडळसिंगी या ८४ कि.मी. रस्त्यासाठी १७१ कोटी ३६ लाख मध्ये हा रस्ता पुर्ण होईल असे अंदाज पत्रक होते. त्या आणि आजच्या परिस्थितीत प्रत्येक वस्तूचा दर वाढला असल्याने आता २५२ कोटी ८३ लाख इतका निधी आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. परंतु आडस ते पाडळसिंगी असे ६५ कि.मी. चा रस्ता १७१ कोटी ३६ लाखात होऊ शकतो. तर आडस ते अंबाजोगाई रस्त्याची दुरुस्ती आताच झाली असल्याने काही दिवस तो चांगला राहील त्यामुळे आडस ते पाडळसिंगी हे काम हाती घेण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यासाठी मागेच २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात २३ कोटी ९० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी वाढवून देण्याची मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे. सोळंके यांच्या प्रयत्नामुळे यंत्रणा ही सक्रिय झाली असून वेगाने प्रक्रिया पार पडत असून काही दिवसात निविदा प्रसिद्ध करुन त्यानंतर शासकीय प्रक्रिया पार पडली की, कामाला सुरुवात होणार आहे. हा रस्ता पुर्ण १० मीटरचा करण्यात येणार असून सात मीटर डांबरी रस्ता असेल तर, दोन्ही बाजूंनी दीड-दीड मीटर माती, मुरुमाच्या साईड पट्या असणार आहेत. हे सर्व परिस्थिती पहाता रस्त्याचे काम लवकर सुरू होईल असे दिसून येत असल्याने या रस्त्यावरील येणाऱ्या गावांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.