मृतदेहाच्या विटंबनेला जबाबदार कोण? सोनेसांगवीत जागेच्या वादातून कालपासून अंत्यविधी रोखला

केज : तालुक्यातील सोनेसांगवी सुर्डी येथे मंगळवारी ( दि. २६ ) दुपारी वृद्ध महिलेचे निधन झाले आहे. परंतु येथे स्मशानभूमीचा वाद असल्याने हा अंत्यविधी बुधवार ( दि. २७ ) सकाळी ९:३० वाजेपर्यंत झालेला नाही. त्यामुळे कालपासून मृतदेह घरातच असून मृतदेहाच्या विटंबनेला जबाबदार कोण?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर, ही तीन महिन्यांतील तीसरी घटना असून प्रशासन नेमका हा प्रश्न सोडवणार कधी? असा प्रश्न विचारला जातो आहे.
अंबुबाई काशिनाथ साखरे ( वय ७५ वर्ष ) असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. काल मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास या वृध्द महिलेचे निधन झाले आहे. निधन झाल्यानंतर अंत्यविधीची तयारी सुरू केली. परंतु स्मशानभूमीचा येथे वाद असल्याने अंत्यविधीला विरोध करण्यात आला. त्यामुळे काल दुपारी ३ पासून आज सकाळी पर्यंत अंत्यविधी झाला नाही. जवळपास १८ तासांपासून मृतदेह अंत्यविधी विना असल्याने या मृतदेहाच्या विटंबनेला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. यापुर्वीही येथे दोन वेळा अंत्यविधी रोखल्याची घटना घडली आहे. एक वेळेस तर, ग्रामस्थांनी मृतदेह तहसील कार्यालयात आणले होते. तेव्हा तहसीलदार यांनी स्वतः अंत्यविधीला उपस्थित राहून व शेतकऱ्याची समजूत काढून अंत्यविधी उरकून घेतला. परंतु तीन महिन्यात तीन अंत्यविधी रोखले असल्याने हे प्रकरण चिघळण्याधी स्मशानभूमीचा तिढा प्रशासनाने सोडवावा अशी अपेक्षा गावातील सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.सध्या घटनास्थळी तहसीलदार, युसुफ वडगाव पोलीस ठाणे प्रभारी, कर्मचारी, रिपाइंचे दिपक कांबळे उपस्थित आहेत. ग्रामस्थांशी चर्चा करीत आहेत.