गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या;केज तालुक्यातील घटना

केज: तालुक्यातील नांदूर घाट येथे एका वृध्द अल्पभूधारक शेतकऱ्यांने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी ( दि. २३ ) सकाळी उघडकीस आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
मधुकर निवृत्ती जाधव ( वय ७० वर्ष ) असे मयत वृद्धाचे नाव असून,आज सकाळी जांभळ बेटा शिवारातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नांदूर घाट पोलीस चौकीचे जमादार भालेराव आणि शेख रशीद यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन नांदूर घाट ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मधुकर जाधव यांनी रात्रीच गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पत्नीचा आजार व नाजूक आर्थिक स्थिती त्यामुळे आत्महत्या केली असावी अशी चर्चा असून, पोलीस तपासात आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल.