राजकारण

केज मध्ये महिला राज; अध्यक्षपदी सिता बनसोड तर उपाध्यक्षपदी शितल दांगट बिनविरोध

 

लोकगर्जना न्यूज

केज : येथील नगर पंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक-एकच अर्ज आल्याने नगराध्यक्षपदी जनविकास आघाडीच्या सिता बनसोड तर, उपनगराध्यक्षपदी राष्ट्रीय काँग्रेसच्या शितल दांगट यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष या दोन्ही पदावर महिलांची वर्णी लागल्याने येथे महिला राज आले. यानंतर केज शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

गेल्या महिन्यात केज नगर पंचायतीसाठी १७ सदस्यांची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये जनविकास परिवर्तन आघाडी ८, राष्ट्रवादी काँग्रेस ५, राष्ट्रीय काँग्रेस ३, स्वाभिमानी पुरस्कर्त १ असे सदस्य विजयी झाले. यात कोणालाही बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. येथे सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येकाला जनविकास आघाडीच्या सहकार्याची आवश्यकता होती. सर्वांनी सावध पवित्रा घेत सर्व सदस्य अज्ञात स्थळी हलविले होते. केज नगरपंचायतीत सत्तास्थापनेसाठी जनविकास आघाडी आणि काँग्रेस, स्वाभिमानी यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. यापुर्वीच प्रशासनाने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रोग्राम जाहिर केले होते. त्यावेळी नगराध्यक्षपदासाठी जनविकास परिवर्तन आघाडीच्या सिता बनसोड यांचा तर, उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या शितल दांगट यांचे प्रत्येकी एक-एकच अर्ज आले होते. त्यामुळे दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध झाली. कोणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने निवडणूकी नंतर कोणीही आनंद साजरा केला नव्हता परंतु नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवड होताच आनंद साजरा करत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, आदित्य पाटील, राहुल सोनवणे, बाळासाहेब ठोंबरे, हारून इनामदार, अंकुश इंगळे, सुरेश पाटील, रिपाइंचे दिपक कांबळे, पशुपतीनाथ दांगट, प्रविणकुमार शेप यांच्या सह आदिंच्या उपस्थिती उघड्या जीपमधून शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोलताशा, तसेच गुलाल व भंडाऱ्याची उधळण करीत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यापुर्वी केज नगरपंचायतीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची सत्ता होती, परंतु त्यांच्या केवळ तीन जागांवर विजय मिळविता आल्याने कॉंग्रेसला जनतेने नाकारल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. ज्यांना नाकारले त्यांच्यासोबत गेल्याने जनविकास आघाडीची जिम्मेदार वाढली असून, पुढील पाच वर्ष विकासकामे करुन हा जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्याची कसरत करावी लागणार असल्याची केजमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »